परभणी (प्रतिनिधी) : कॉर्डिलिया क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात आरोपांच्या भोवऱ्यात सापडलेल्या आर्यन खान याला एनसीबीकडून क्लीनचीट दिल्याचा निर्णय म्हणजे सत्याचा विजय आहे. आर्यन खान विरुद्धचे आरोप हे खोटे आहेत, असे राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी सातत्याने नमूद केले. या फर्जीवाड्याविरोधात खुलेआम टीका केली. अखेर मलिक यांचेच म्हणणे खरे ठरले. मात्र, सत्यासाठी झगडणाऱ्या मलिक यांनाच आज अन्यायास सामोरे जावे लागत आहे, अशी खंत खा़.सुप्रिया सुळे यांनी परभणीत व्यक्त केली.
राष्ट्रवादी भवनात शुक्रवारी, (दि.२७) आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. अॅड. विजय गव्हाणे, खा़. फौजिया खान, आ. बाबाजानी दुर्राणी, महानगर जिल्हाध्यक्ष प्रताप देशमुख, माजी आ. डॉ.मधुसुदन केंद्रे, माजी खा. सुरेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.किरण सोनटक्के, तालुकाध्यक्ष संतोष देशमुख आदी उपस्थित होते.
खा़.सुळे म्हणाल्या, दिव्यांगांबाबत महाविकास आघाडी सरकारने प्राधान्याने अनेक विषय हाताळण्याचे काम सुरु केले आहे. राज्याचा आरोग्य विभाग, अर्थविभाग तसेच समाजकल्याण विभागाने दिव्यांगांच्या प्रश्नासंदर्भात संयुक्तपणे भविष्यातही काही उपक्रम राबविण्याचा संकल्प सोडला आहे. विशेषत: जन्मलेल्या प्रत्येक बाळाची २४ तासाच्या आत टेस्टिंग व्हावी, असे प्रयत्न सुरु आहेत. लवकरच गावपातळीपर्यंत या अनुषंगाने टेस्टिंगची सुविधाही निर्माण केली जाईल.
जन्मलेल्या मुलात काही दोष आढळल्यास तातडीने पुढील उपचार सुरु करता येतील. त्यामुळे त्या बालकाला भविष्यात कोणत्याही अडचणी निर्माण होणार नाहीत, असे खा. सुळे यांनी सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे व समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या अनुषंगाने सकारात्मक प्रयत्न सुरू केले आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर, राज्य सरकार यांच्या माध्यमातून दिव्यांगांच्या टेस्टिंग तसेच कानाचे मशीन उपलब्ध करण्यासंदर्भात आज परभणीत विशेष उपक्रम राबविण्यात आला. तसेच दिव्यांगांसाठीचा ०५ टक्के निधीची तरतूद व्हावी व तो निधी खर्च व्हावा, या दृष्टीकोनातून सरकार प्रयत्नशील आहे़ ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत महाविकास आघाडी सरकारने नियोजनबद्ध हालचाली सुरु केल्या आहेत़, अशी माहिती खा़. सुळे यांनी यावेळी दिली.