परभणी : आज आपण आपसातील संवाद हरवत चाललो आहोत. याची परिणीती मनातला ताण वाढत जाऊन निराशेचे रूप घेत आहे. तसेच आजचा युवक व्यसनाकडे वळत आहे.
आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक ताणातून आलेल्या एककीपणामुळे आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. आत्महत्या रोकण्यासाठी आपण अशा व्यक्तीला मदतीचा हात देण्याची गरज आहे. आत्महत्येचे विचार मनात येणा-या व्यक्तीने हे विचार कुणा जवळ तरी बोलून दाखवावेत, त्यासाठी वैद्यकीय मदत घेण्यासाठी घाबरू नये असे आवाहन परभणी शहरातील मानसोपचार तज्ञ डॉ.जगदीश नाईक यांनी केले.
महातपुरी येथे शिवजयंती निमित्त आयोजित सप्ताह कार्यक्रमात मानसोपचार तज्ञ डॉ.नाईक बोलत होते. या प्रसंगी सरपंच प्रल्हाद शिंदे, उपसरपंच किरण चाफळे, माजी उपसरपंच उत्तम आणा मुलगीर, सर्व ग्राम पंचायत सदस्य, चेयरमन प्रकाश शिंदे, पोलीस पाटील विजय चाफळे, युसूफ खान, सखाराम बोबडे, मजि सैनिक प्रभु चाफळे, माजी सैनिक त्रिम्बक दुमने, डॉ.दिघोळे, डॉ.कदम आदी उपस्थित होते.
यावेळी डॉ. ज्ञानोबा खटींग यांनी स्वत:चे अनुभव सांगून कितीही खडतर प्रसंग आले तरी त्यां प्रसंगाना जिद्दीने सामोरे जायला हवे, आत्महत्या ही पळवाट आहे असे सांगितले.
आत्महत्या का घडतात मागची सविस्तर कारण मिमांसा शिक्षक वालवटे, मोटे यांनी आपल्या मनोगतात स्पष्ट केली.
मानसशास्त्राचे प्रा.माणिक लिंगायत यांनी आत्महत्या करणारी व्यक्ती ओळखता येऊ शकते. अश्या व्यक्तीच्या वागण्यात, बोलण्यात, भावनेत झालेले बदल जर लक्षात घेतले तर आत्महत्या करणा-यास वाचवता येऊ शकते. शिक्षक मानकर यांनी आत्महत्येची आकडेवारीची माहिती देऊन चिंता व्यक्त केली व यासाठी सर्वोपत्तरी प्रयत्न होण्याची गरज बोलून दाखवली.
सूत्रसंचालन बापूराव मुळे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन अमजद शेख यांनी केले. आभार प्रदर्शन मानकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी वसंत शिंदे, सचिन सुरवसे, रायाजी सुरनार, शंकर खजे आदिनी परिश्रम घेतले.