26.5 C
Latur
Sunday, January 17, 2021
Home परभणी पहाटे पाचला अधिकारी पोहचले हागणदारीत

पहाटे पाचला अधिकारी पोहचले हागणदारीत

एकमत ऑनलाईन

परभणी : ग्रामीण भागातील नागरिकांच्या चांगल्या आरोग्यासह महिलांच्या सन्मानासाठी शौचालयाचा नियमित वापर करावा म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांच्यासह अधिकारी पहाटे पाच वाजता पिंगळी बाजारच्या हागणदारीत पोहचले. यावेळी उघड्यावर शौचास जाणा-या नागरिकांना शौचालय वापराबाबतची माहिती पुस्तिका देवून शौचालयाचा नियमित वापर करण्याच्या सुचना देण्यात आल्या.

सीईओ टाकसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी दि.10 जानेवारी रोजी परभणी तालुक्यातील पिंगळी बाजार ग्रामपंचायतमध्ये पहाटे ५ वाजता जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचा-यांची टीम हागणदारीच्या मार्गावर धडकली. या वेळी उघड्यावर जाणा-या ग्रामस्थांना शौचालय वापराबाबतची माहिती पुस्तिका देऊन त्यांना शौचालयाचा नियमित वापर करण्याची सुचना करण्यात आली. सुचना करूनही न ऐकणा-या नागरिकांना ५०० रुपयांचा दंड करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.यानंतर गावच्या चारही प्रमुख रस्त्यांच्या ठिकाणी जाऊन गुड मॉर्निंग पथकाने नागरिकांना स्वच्छतेचा संदेश दिला. तसेच गावातून स्वच्छता फेरी काढून नळ कनेक्शनची पाहणी करण्यात आली. यावेळी पाणी बचती बाबत टाकसाळे यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी श्री.टाकसाळे यांनी उपस्थित गावक-यांना शौचालयाच्या नियमित वापराबाबत मार्गदर्शन केले. उघड्यावर शौचास गेल्यामुळे महिलांना पोटाचे आजार बळावत आहेत. माणसाचे आरोग्य कमी होऊन येणारी पिढीही रोगीट होण्यास कारणीभूत ठरत आहे. तसेच माशांमार्फत दूषित पाण्यातून, खान्यातून अनेक रोग उद्भवत आहेत. नागरिकांनी टीव्ही, मोबाईल, गाडी अशा चैनीच्या वस्तूपेक्षा शौचालय बांधकाम करून त्याचा नियमित वापर करण्याचे टाकसाळे यांनी सांगितले.

यावेळी स्वच्छ भारत मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता गंगाधर यंबडवार, महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.कैलास घोडके, परभणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनुप पाटील, गावचे सरपंच जगन्नाथ गरुड, उपसरपंच अनंत गरुड, ग्रामसेवक तुकाराम साके, आशाताई, अंगणवाडीताई आदींची उपस्थिती होती.

भरभराटीचे संकेत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,409FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या