परभणी : यावर्षी पावसाळ्यास सुरूवात झाल्यापासून अद्यापपर्यंत एकदाही जोरदार पावसाने हजेरी लावलेली नाही. शहरासह जिल्ह्यात काल बुधवारी २.२६ मिमि. पावसाची नोंद करण्यात आली आहे. परंतू १ जून पासून आजपर्यंत जिल्ह्यात केवळ १.३५ मिमि. पाऊस झाला असल्याने शेतक-यांसह नागरिकांचे जोरदार पावसाच्या आगमनाकडे लक्ष लागले आहे. दुसरीकडे थोड्याशा पावसानंतर शहरातील रस्त्यावर पाणी साचत असल्याने वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकातून तीव्र नाराजी व्यक्त होताना दिसून येत आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सक्रिय झाला आहे. शहरासह जिल्ह्यात काल बुधवारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचून अनेक रस्ते चिखलमय झाले होते. तसेच अनेक ठिकाणी रस्ते निसरडे झाल्याने वाहन चालकांना वाहने चालवताना तारेवरची कसरत करावी लागली. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २.२६ मि.मि. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारी झालेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी पुढील प्रमाणे असून कंसातील आकडेवारी यंदाच्या एकूण पावसाची आहे. परभणी २.७६(८१Þ०), जिंतूर ६.८, पूर्णा १.७७, पालम २.१९, गंगाखेड २.९२, सेलू ३.०९, सोनपेठ ३.८४, पाथरी १.८२ आणि मानवत १.९३ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७६.१३ मि.मी. असून १ जूनपासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी फक्त १.३५ मि.मी. पाऊस झाला आहे. त्यामुळे पेरण्यांची कामे उरकण्यासाठी जोरदार पावसाची आवश्यकता असल्याचे मत शेतक-यांतून व्यक्त होत आहे.