परभणी : येथील हजरत सय्यद शाह तुराबूल हक रहे. यांच्या ११६ वा उर्स शरीफ महोत्सवास बुधवार, दि़ १ फेब्रुवारी पासून सुरवात होणार आहे. या निमित्ताने दर्गाह शरीफ येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थित उदघाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
परभणी शहरातील उर्स निमित्त बुधवारी दुपारी ३ वाजता मशीद ए उस्मानिया रेल्वे स्टेशन येथून संदल शरीफ निघणार असून शहराच्या प्रमुख भागातून तो दर्गाह परिसरात पोहचेल. संध्याकाळी ६.३० वाजता महोत्सवाचे उदघाटन जिल्हाधिकारी व उर्स आयोजन समितीचे अध्यक्ष श्रीमती आंचल गोयल यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय मून, पोलीस अधीक्षक श्रीमती रागासूधा आऱ, विशेष अतिथी म्हणून महाराष्ट्र वक्फ मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद, महानगर पालिकेच्या आयुक्त श्रीमती तृप्ती सांडभोर, सिव्हिल सर्जन डॉ.सुहास जगताप, अधीक्षक अभियंता शांतीलाल चौधरी यांची उपस्थिती असेल.
वक्फ मंडळाचे अध्यक्ष डॉ.वजाहत मिर्झा, खासदार व बोर्ड सदस्य फौजिया खान, बोर्ड सदस्य, मुख्यकार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली व्यवस्थापन करण्यात येत आहे अशी माहिती उर्स व्यवस्थापन समिती प्रमुख खुसरो खान व प्रभारी जिल्हा वक्फ अधिकारी अब्दुल रफिक यांनी दिली.
परभणीकरासह मराठवाडा, कर्नाटक तसेच तेलंगणा राज्यातून लाखो लोक उर्स महोत्सवाला उपस्थित असतात. या उर्स महोत्सवात ८ फेब्रुवारी रोजी मास्टर कॅफे येथे कव्वाली तसेच परिसंवाद व क्रिकेट स्पर्धा, ११ फेब्रुवारीस मुशायरा मैदान येथे मुशायरा, ९ फेब्रुवारीस शाम ए गझल कार्यक्रम व १५ फेब्रुवारी रोजी व्हॉलीबाल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उर्स यशस्वीपणे पार पाडण्यास मुख्य कार्यालय औरंगाबाद येथून ही विशेष टीम पाठविण्यात आली आहे.