परभणी : केंद्रातील युवा आणि क्रीडा मंत्रालयाच्या वाय-२० उपक्रमांतर्गत येथील श्री शिवाजी महाविद्यालयात ०२ मार्च रोजी सकाळी ११ वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरील स्पर्धेत पहिल्या पाचमध्ये येणा-या विद्यार्थ्यांना सिम्बॉयोसिस विद्यापीठात होणा-या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
या संदर्भात अधिक माहिती देताना प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरील विविध देशाच्या जी-२० संघटनेच्या धर्तीवर केंद्रातील युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली वाय-२० स्थापन करून भारतातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये एकूण १८ आंतरराष्ट्रीय बैठका होत आहेत. महाराष्ट्र राज्यातील ११ मार्च रोजी सिम्बॉयोसिस विद्यापीठ पुणे येथे निवड झालेल्या विद्यार्थ्यांची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातुन एका महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे.
परभणी जिल्ह्यातून श्री शिवाजी महाविद्यालयाची निवड करण्यात आली आहे. ०२ मार्च रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात भविष्यातील कामकाज: उद्योग ४.०, नविनता आणि एकविसाव्या शतकाचे कौशल्य , हवामान बदल आणि आपत्ती धोका कपात: टिकाऊपणा जगण्याचा एक मार्ग, शांतता निर्माण आणि समेट: युद्धरहित नवीन युगात प्रवेश, शेअर सामाईक भविष्य : लोकशाही आणि शासनात युवांचा सहभाग, स्वास्थ्य कल्याण आणि खेळ : युवकांसाठी आराखडा या नाविन्यपूर्ण विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाचे उदघाटन उच्च शिक्षण सहसंचालक डॉ.आर.एम.धायगुडे यांच्या हस्ते होणार आहे. तर अध्यक्ष म्हणून महाविद्यालय विकास समितीचे प्रमुख हेमंतराव जामकर, प्रमुख उपस्थितीत प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य डॉ.श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्या डॉ.विजया नांदापुरकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.रोहिदास नितोंडे, स्पर्धा समन्वयक डॉ.तुकाराम फिसफिसे आदींची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत अधिकाधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ.बाळासाहेब जाधव यांनी केले आहे.