परभणी : महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ अंतर्गत पशु वैद्यकीय महाविद्यालय परभणी येथील चौथ्या वर्षाची विद्यार्थीनी साक्षी सुरेशराव काशीकर हिची राजपथ नवी दिल्ली येथे होणा-या प्रजासत्ताक दिन परेडसाठी निवड झाली आहे. या परेडसाठी महाराष्ट्रातील ७ मुले व ७ मुलींची निवड झाली असून यामध्ये परभणी जिल्ह्यातून एकमेव साक्षी हिचा समावेश आहे.
युवा कार्य क्रीडा मंत्रालय, राष्ट्रीय सेवा योजनेचे पुणे येथील क्षेत्रीय निदेशालय यांनी नुकतेच पत्रान्वये परभणी येथील पशु वैद्यकीय महाविद्यालयाला साक्षी काशीकर हिची निवड झाल्याचे कळवले आहे़ दि़२६ जानेवारी २०२३ रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथ नवी दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन परेडचे आयोजन करण्यात येते़ यामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा एक दल सहभागी होत असतो़ राष्ट्रीय सेवा योजनेच्या या दलामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेची स्वंयसेवक म्हणून साक्षी काशीकर सहभागी होणार आहे.
पशु वैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. विवेक देशमुख यांनी या निवडीबद्दल साक्षी कशीकर हिचे अभिनंदन केले आहे़ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉक़ाकासाहेब खोसे यांचे तिला मार्गदर्शन लाभले़ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी यांनी साक्षीच्या यशाबद्दलतिचे अभिनंदन केले आहे.