परभणी : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे ५७ वे तर देवगिरी प्रदेशाचे पहिले अधिवेशन २०, २१ व २२ जानेवारी रोजी विष्णू जिनींग मैदानावर होणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष आमदार मेघना बोर्डीकर यांनी दिली.
परभणी येथे होणा-या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या प्रांत अधिवेशना निमित्त आयोजित पत्रकार परिषदेत आ़बोर्डीकर बोलत होत्या़ यावेळी शहराध्यक्ष गिरीश कौसडीकर, देवगिरी प्रांतचे उपाध्यक्ष नाना गोडबोले, डॉ़अनिल कान्हे, प्रा़ ज्ञानोबा मुंढे, संतोष धारासूरकर, अमोल जोशी, शहर मंत्री अभिषेक बनसोडे, अॅड. अशोक गुजराथी आदींची उपस्थिती होती.
परभणी येथे होणा-या या तीन दिवसीय अधिवशेनामध्ये विविध कार्यक्रम तसेच चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे़ देवगिरी प्रांतातील १४ जिल्ह्यातील १२०० विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित राहणार असून परभणी जिल्ह्यातील ०२ हजार विद्यार्थी सहभागी होणार आहेत़ या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी केंद्रीय कायदा मंत्री किरण रिजुजू उपस्थित राहणार आहेत़ या अधिवेशनस्थळास संत जनाबाई नगरी तर मुख्य सभागृहास कै दादा पवार यांचे नाव देण्यात येणार आहे. तर संमेलन नगरीतील व प्रदर्शनी स्थळास साहित्यीक, कवी बी़रघुनाथ यांचे नाव देण्यात येणार आहे. दि़ २१ जानेवारी रोजी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार असून शारदा महाविद्यालय येथून या शोभायात्रेस प्रारंभ होणार आहे़ शहरातील प्रमुख मार्गाने ही शोभायात्रा छ. शिवाजी महाराज पुतळा परीसरातील मैदानावर येणार असून या ठिकाणी जाहीर सभेने समारोप होणार आहे. दि. २२ जानेवारी रोजी समारोपीय सत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील अनुषंगाने महत्वपूर्ण ठराव पारीत करण्यात येणार आहेत.
या तीन दिवसीय अधिवशेनाची उद्योजकता, स्वावलंबी भारत व नवीन शैक्षणिक धोरण अशी थिम असणार आहे. या अधिवेशनात प्रदेश पातळीवरील नूतन कार्यकारिणीची घोषणा होणार आहे़ या अधिवेशनाच्या निमित्ताने स्वागत समिती स्थापन करण्यात आली असून या समितीत विविध स्तरावरील मान्यवरांचा सहभाग राहणार आहे़ त्याच बरोबर अन्य समित्याही गठीत करण्यात आल्या असून अधिवेशनाची जय्यत तयारी सुरू आहे.