परभणी : जिंतूर तालुक्यातील काजळी रोहिणा येथे मंगळवार, दि.०७ जून रोजी सायंकाळच्या सुमारास दुधना नदीपात्रात पोकलेनद्वारे रेतीचे उत्खनन सुरु असताना पोलिसांनी छापा मारुन कारवाई केली. या प्रकरणी १७ आरोपींविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोकलेन-१, ट्रॅक्टर-३, टेम्पो-४ व रेती असा एकूण ८९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अवीनाश कुमार यांना गोपनिय माहिती मिळाली होती. काजळी रोहीना येथे दुधना नदीपात्रात पोकलेनद्वारे रेतीचे उत्खनन होत असल्याच्या माहितीची खातरजमा करुन मंगळवारी सायंकाळी काजळी रोहिना येथे छापा मारण्यात आला. यावेळी एका पोकलेन मशिनद्वारे नदीपात्रातील रेती उत्खनन करून एका ट्रॅक्टरमध्ये भरत असताना दिसून आले. याप्रकरणी १७ आरोपींविरूध्द सेलू पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोकलेन-१, ट्रॅक्टर-३, टेम्पो-४ व रेती असा एकूण ८९ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक जयंत मीना व अपर पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अवीनाश कुमार यांनी संबंधित पोलीस ठाणे व महसूल विभागासमवेत मिळून ही कारवाई केली आहे.