पूर्णा : पूर्णा तालुक्यातील सारंगी-मिठापूर अधिकृत रेती धक्क्यावर शासकीय नियमांची पायमल्ली करीत तब्बल चार पोकलेन यंत्रांच्या साह्याने प्रचंड प्रमाणात अवैध रेतीचे उत्खनन करणा-या ठेकेदाराला गंगाखेडचे उपविभागीय पोलिस अधिकारी श्रेणिक लोढा यांनी सोमवारी जबर दणका दिला.
लोढा यांच्या पथकाने या धक्क्यावर धाड टाकून ठेकेदार हनुमंत पौळ याच्या ४ पोकलेन मशीन, ९ हायवा, २ स्कॉर्पिओ गाड्या, १४ मोबाईल, ३ लाख ४४ हजार ७०० रुपयांची रोकडे असा एकूण १ कोटी ८८ लाख १६ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धाडीमुळे अवैध वाळू उपसा करणा-यांसह पूर्णा महसूल खात्याला चपराक बसली आहे.
सारंगी- मिठापूर शिवारातील गोदावरी नदीपात्रातील अधिकृत मिठापूर रेती धक्काचालक हनुमंत मनोहरराव पौळ या रेती धक्का परवानाधारकाने गोदावरी नदीपात्रात व पात्रा बाहेर येणा-या- जाणा-या रस्त्यावर गोदावरी नदीच्या नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण करून व प्रवाह बदलून पोकलेन यंत्राने अवैधपणे वाळू उपसा सुरू केला होता. शासनाच्या अटी व शर्थींचा भंग करून प्रवाहाबाहेर अवैध रेतीचे उत्खनन सुरू होते. ठेकेदाराच्या या कृत्यामुळे शेतीसह पिण्याच्या पाण्यामध्ये घट होत होती. तरीही त्याने नदी पात्रातील ठराविक क्षेत्र सोडून अधिक वाळू उत्खनन सुरू ठेवल्याच्या तक्रारी होत होत्या.
या अनुषंगाने प्रशिक्षणार्थी आयपीएस अधिकारी श्रेणिक लोढा यांच्या पथकाने रविवारी दुपारी त्या ठिकाणी धाड टाकली. अचानक पडलेल्या या धाडीमुळे धक्काचालक आणि त्याच्या सहका-यांचे धाबे दणाणले. या धाडीनंतर आसपासच्या धक्केचालकांनीही आपले धक्के बंद करून पळ काढला.
दरम्यान, चुडावा पोलिस स्थानकात पोलिस हेड कॉन्स्टेबल सूर्यकांत भगवानराव केजगीर यांच्या फिर्यादीवरून हनुमंत मनोहरराव पौळ (रा. फळा ता. पालम), माऊली घोरपडे, संदीप ढगे (रा. कंठेश्वर ता. पूर्णा), जिया खान पठाण, लिंबाजी तुळसीराम आव्हाड (रा. सायाळा ता. पालम) या पाच जणांवर सोमवार, दि.०६ जून रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा पुढील तपास चुडावा पोलिस स्थानकाचे सहायक पोलिस निरीक्षक बाचेवाड करीत आहेत.