परभणी : कापूस आणि सोयाबीनचे दर वाढले पाहिजेत. केंद्र सरकारने हमी भाव कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर करावा. शेतक-यांना ऊसाची एफआरपी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवार, दि.२२ फेब्रुवारी रोजी संपूर्ण राज्यभरात चक्का जाम आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभुमीवर परभणी जिल्ह्यातील कोक पाटी, लिमला फाटा व अन्य ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होवून रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
पूर्णा तालुक्यातील लिमला फाटा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लिमला मंडळाची अतिवृष्टीची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर तात्काळ वर्ग करावी आदी मागण्यांसाठी प्रशासनास विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या सर्व मागण्यांचे निवेदन तलाठी सुरेखा देशमाने यांनी स्वीकारले. या निवेदनात बुलडाण्यातील शेतकरी नेते रविकांत तूपकर यांच्यासह आंदोलकांवर दाखल केलेले खोटे गुन्हे परत घेण्यात यावेत.
आंदोलकांवर लाठीचार्ज केलेल्या अधिका-यांची चौकशी करून कार्यवाही करावी. खरीप व रब्बी पिकांचा पिक विमा तात्काळ देण्यात यावा. राज्य सरकारने जाहीर केलेली नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना ५०००० रूपये अनुदान तात्काळ देण्यात यावे. शेतीपंपाची बेकायदेशीर वीज तोडणी तात्काळ थांबवण्यात यावी. शेती पंपाला दिवसा १२ तास लाईट देण्यात यावी.
तेलंगणाच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने शेतकरी योजना सुरू कराव्यात. हरभरा हमी भाव खरेदी केंद्र लवकर सूरू करून ०८ ऐवजी १२ क्विंटल खरेदी करावी आदी मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प होवून वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर ढगे, भगवान शिंदे, भास्कर खटींग, रामेश्वर आवरगंड, बालासाहेब घाटोळ, दिगंबर दादा पवार, प्रसाद गरुड, पंडित अण्णा भोसले, कृष्णा शिंदे ,माऊली लोंढे, मोकीद वावरे, किरण गरुड, पांडुरंग दुधाटे, अंकुश शिंदे, सचिन शिंदे, नवनाथ दुधाटे, राम दुधाटे, विष्णू दुधाटे गिरीधर शिंदे शिवाजी शिंदे, राम काळे व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे उपजिल्हाअधक्ष केशव आरमळ यांच्या नेतृत्वाखाली कोक पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक आर.रागसूधा यांनी भेट दिली असता त्यांनी आंदोलकांच्या वतीने निवेदन स्विकारले. या आंदोलनात केशव आरमळ, सलीमभाई कोक्कर, सुरेश रासवे, गजानन वाणी, दत्तराव झाडे, मूसतखीम भीवाजी मानवते माऊली कदम, शोयब पठाण, शेख रहिम, तुकाराम घाटूळ, सयद लालभाई नईम पटेल महादू आव्हाड, मुंजाजी घूले, राहूल काठोळे आदींची उपस्थिती होती. यावेळी जोरदार घोषणाबाजी करीत परीसर दणाणून सोडण्यात आला. रास्ता रोको आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती.
लिमला मंडळासाठी लढाई सुरूच राहील
लिमला मंडळात अतिवृष्टीने व संतत धार पावसाने पिके उध्वस्त झाली होते. या पिकांचे पंचनामे होऊन आज बरेच महिने उलटले. परंतू शेतक-यांच्या खात्यावर मदत वर्ग करण्यात आलेली नाही. लिमला मंडळावर वारंवार असा अन्याय का केला जात आहे. अशी मागणी लिमला मंडळातील शेतकरी करत आहेत. लिमला मंडळातील शेतक-यांना तात्काळ अनुदानाची रक्कम खात्यावर वर्ग न झाल्यास टोकाची भूमिका घ्यावी लागेल. हे अनुदान जोपर्यंत लिमला मंडळातील शेतक-यांच्या खात्यावर पडत नाही तोपर्यंत आमची लढाई सुरूच राहील असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटना पूर्णा तालुकाध्यक्ष पंडित अण्णा भोसले यांनी दिला आहे.