पालम : गंगाखेड शुगर अॅन्ड एनर्जी या कारखान्याचा गाळप परवाना राज्याचे साखर आयुक्त यांनी रद्द केला असून हा परवाना रद्द करण्याचे राजकीय षडयंत्र आहे. यामुळे कारखाना क्षेत्रातील हजारो शेतक-यांचा लाखो मेट्रिक टन ऊस उभा राहनार आहे. शेतक-यांच्या हितासाठी सरकारने राजकारण बाजूला ठेवून या कारखान्याला गाळप परवाना देण्याच्या मागणीसाठी पालम येथे आज शेतक-यांनी जोरदार रास्तारोको आंदोलन केले. या आंदोलनामुळे लोहा- गंगाखेड रोडवर दोन तास वाहतूक ठप्प झाली होती. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर कारवाई केली.
गंगाखेड शुगरचा परवाना रद्द केल्याच्या निषेधार्थ कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी सरकार विरोधात एल्गार पुकारला असून पालमच्या तहसील कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. आंदोलनाच्या दुस-या दिवशी पालम शहरात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या वरही सरकारने गाळप परवाना न दिल्यास शेतकरी आणखी तीव्र आंदोलन करतील असा इशारा आमदार रत्नाकर गुट्टे मित्र मंडळाचे पालम, पूर्णा प्रभारी माधवराव गायकवाड यांनी दिला.
या रास्ता रोको दरम्यान वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. तर शहाराच्या दोन्ही बाजूनी वाहनाच्या रांगच रांगा दिसून येत होत्या. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेत त्यांच्यावर पालम पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अंदोलनादरम्यान पोलीस निरीक्षक दीपक शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन ईंगेवाड,फौजदार सहाने यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.