परभणी : शहरातील मराठवाडा प्लॉट भागातील साई कॉर्नर परीसरात सतिश कोंडीबा वाघमारे व सुनिल कोंडीबा वाघमारे या दोन सख्ख्या भावात शनिवारी मध्यरात्री वाद झाला होता. या वादातून सुनिल याने सतिशला काचेचा ग्लास व चाकुने मारून गंभीर जखमी केले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सतिश याचा मृत्यू झाला असून आरोपी सुनिल वाघमारे याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्याविरूध्द नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
या बाबत रामचंद्र वाघमारे यांनी पोलिसांत तक्रार दिली असून या तक्रारीत म्हटले आहे की, ते घरी असताना पहाटे ५.३० वाजताच्या सुमारास त्यांना त्यांचा भाचा सुधीर वाघमारे याने फोन करून सतिश रक्तबंबाळ अवस्थेत खोलीत पडले असल्याचे सांगितले़ त्यानंतर रामचंद्र वाघमारे यांनी मराठवाडा प्लॉट भागातील घरात जावून पाहणी केली असता सतिश खाली पडल्याचे तर सुनिल शेजारच्या कॉटवर झोपला असल्याचे आढळून आले.
याबाबत सुनिलकडे चौकशी केली असता त्याने सतिशने माझ्या तोंडावर ठोसा मारत तू येथे कशाला आलास असे म्हणून पलंगावरून खाली पाडले व मारहाण करण्यास सुरूवात केली़ त्यामुळे कळशी, काचेचा ग्लास व चाकुने सतिशवर वार केल्याचे सुनिलने सांगितल्याची माहिती वाघमारे यांनी नानलपेठ पोलिसांना दिली या प्रकरणी सुनिल वाघमारे याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे समजते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र शिरतोडे, पोलिस निरीक्षक समाधान चवरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली़ तपास सपोनि़ सांगळे करीत आहेत़ यावेळी नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी जमा झाली होती.