26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीवाळू तस्करांचा उपविभागीय अधिका-यांच्या गाडीवर हल्ला

वाळू तस्करांचा उपविभागीय अधिका-यांच्या गाडीवर हल्ला

एकमत ऑनलाईन

सोनपेठ : तालुक्यातील वाढत्या अवैध वाळू उपशा विरोधात पाथरी येथील उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे यांनी कारवाईचा धडाका लावला आहे. त्यामुळे चवताळलेल्या वाळू माफियांनी मंगळवारी दि.११ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास निकाळजे यांच्या गाडीवर दगडफेक केल्याची घटना घडली. या प्रकरणी निकाळजे यांनी सोनपेठ पोलिसांत तक्रार दिली असून अज्ञात वाळू माफिया विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

तालुक्यातून वाहणा-या गोदावरीच्या पात्रातून अवैध वाळू उपसा जोरात सुरू असून ही वाळू परजिल्ह्यात पळवली जात आहे. यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांचे वाळू माफियांशी आर्थिक हीतसंबध असल्याची चर्चा आहे. सोनपेठचे तहसीलदार डॉ.आशिषकुमार बिरादार यांनी तालुक्यातील अवैध वाळू उपशाला काही प्रमाणात प्रतिबंध घातला असतानाही वाळूमाफिया काही वरिष्ठ अधिका-यांना हाताशी धरुन अवैध वाळू उपसा करत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे प्रशासनातील चांगल्या अधिका-यांना त्रास होत असून यातूनच निकाळजे यांच्या गाडीवर मंगळवारी दगडफेक झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेत वाळू माफियांनी वाहनावर दगडफेक करीत त्यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. यामध्ये निकाळजे व त्यांचे चालक एकनाथ गायकवाड बालंबाल बचावले. यापुर्वी पाथरी तालुक्यातील गौडगाव येथे त्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.

वाळू माफियांनी याआधी देखील अनेक कर्मचारी व अधिका-यांवर जीवघेणे हल्ले केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तालुक्यातील लासीना, कान्हेगाव, खडका, मोहळा आदि ठिकाणाहून अवैध वाळू उपसा केला जात आहे. तसेच पाथरी तालुक्यातील मुद्गगल, मानवत तालुक्यातील वांगी या ठिकाणाहून देखील रात्रंदिवस वाळू उपसा सुरू आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल देखील बुडत आहे.

संबंधित प्रकार घडल्यानंतर निकाळजे यांनी सोनपेठ पोलिसात अज्ञात वाळू माफियांच्या विरुद्ध तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सोनपेठ पोलिसांनी वाळू माफियांच्या विरुद्ध कडक मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक संदीपान शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास भिकान करत आहेत.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन लसीचे भारतात उत्पादन?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या