परभणी : परभणी शहरात अखिल भारतीय वारकरी साहित्य संमेलनाचे दि़१२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान आयोजन करण्यात आले आहे़ या संमेलनाची सुरूवात रविवारी सकाळी पहिल्या दिवशी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ आमदार सुरेश वरपूडकर यांच्या हस्ते साहित्य दिंडीचा शुभारंभाने झाली आहे.
या दिंडीत पारंपारीक वेशभुषेत सहभागी झालेल्या वारक-यांसह बाल, गोपाळांमुळे दिंडीने शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरातून सुरू झालेली ही दिंडी वसमत रस्त्याने संत तुकाराम महाविद्यालयात पोहचली. दिंडीच्या शुभारंभ कार्यक्रमास वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्रचे अध्यक्ष विठ्ठल (काकाजी) पाटील, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, माजी आमदार सुरेश देशमुख, माजी उपमहापौर भगवानराव वाघमारे, सुभाष जावळे, राजेंद्र वडकर, दिलावर नदाफ, सुहास पंडीत आदींची उपस्थिती होती.
या दिंडीत पारंपारीक वेशभुषेतील वारक-यांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या़ तसेच या दिंंडीत बाल गोपाळांनी विविध संताची वेशभुषा साकारली होती़ त्यामुळे या दिंडीने शहरातील नागरीकांचे लक्ष वेधून घेतले़ या दिंडीने संत साहित्य संमेलनास जोरदार सुरूवात झाली आहे. या संमेलनासाठी ग्रामिण भागासह शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने गर्दी झाल्याचे चित्र पहावयास मिळाले़ या संमेलनामुळे शहरात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे.