परभणी : पुरस्कार हे जबाबदारीचे भान देतात. मला मिळालेला लोपामुद्रा हा पुरस्कार मी शांतीवन या आमच्या संस्थेला पुढे घेऊन जाणा-या दात्यांना समर्पित करीत आहे. निस्वार्थ कृती ही सामाजिक कायार्चा आत्मा असतोÞ या तत्वाने आम्ही आमचे कार्य करीत आहोत, असे प्रतिपादन शांतीवन या निराधारांना आधार देणा-या सामाजिक संस्थेचे संचालक दीपक नागरगोजे यांनी केले.
येथील गणेश वाचनालयात शुक्रवार, दि.०६ जानेवारी रोजी भारतीय स्वातंर्त्य लढा व मराठवाडा मुक्ती संग्रामातील परभणीचे ज्येष्ठ स्वातंर्त्यसेनानी कै.मुकुंदराव पेडगावकर यांच्या स्मरणार्थ पेडगावकर परिवार व गणेश वाचनालयाच्या वतीने एक दिवसीय व्याख्यान समारोहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.दत्तात्रय मगर होते तर प्रमुख पाहुणे म्हणून कवी इंद्रजीत भालेराव यांची उपस्थिती होती. यावेळी कै.बकुळाबाई मुकुंदराव पेडगावकर यांच्या नावे देण्यात येणारा लोपामुद्रा पुरस्कार सेवाकार्य करणा-या दीपक नागरगोजे यांना मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या प्रसंगी गणेश वाचानालयाचे कर्मचा-यांसह नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती