गंगाखेड : समाजात आज सुयोग्य संस्कार निर्माण करण्याची गरज असून निकोप पिढी घडविण्यासाठी आध्यात्मिक उपक्रमाची खरी गरज असल्याचे प्रतिपादन आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी केले.
तालुक्यातील झोला येथील महाशिवरात्र उत्सवाचे प्रमुख पाहुणे आणि विविध विकास कामांचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी हभप.शिवाजी महाराज आळंदीकर, मित्र मंडळाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हाद मुरकुटे, रासपचे जिल्हाध्यक्ष संदीप आळनुरे, विधानसभा अध्यक्ष कृष्णाजी सोळंके, युवा वक्ते संदीप माटेगावकर, सरपंच प्रताप मुरकुटे, रासप शहराध्यक्ष धनंजय भेंडेकर, वैजनाथ शिंदे, सरपंच प्रताप कदम, सचिन झोलकर, बालासाहेब शिंदे, अप्पासाहेब कदम, चैतन्य पाळवदे उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. डॉ. ग़ुट्टे म्हणाले, सध्याचा काळ फार गतिमान झाला आहे. हातातल्या स्मार्ट फोनमुळे माणसाल्या संवेदना व संवाद सुध्दा कमी होत आहे. त्यामुळे माणसं एकाकी पडू लागली आहेत. संवादाची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी शहरी व ग्रामीण भागात सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व आध्यात्मिक कार्यक्रम सातत्याने झाले पाहिजेत, असे मत आ.डॉ.गुट्टे यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जल जीवन मिशन अंतर्गत नवीन पाण्याची टाकी व पाईपलाईन, प्रभाकर महाराज मठाकडे जाणारा सि.सि.रोड व सभा मंडप, गावातील अंतर्गत सि.सि.रोड व नाली बांधकाम, मातोश्री पांदन रस्ता, महादेव मंदिर सभा मंडप अशा विविध विकास कामांचे उद्घाटन व लोकार्पण आ.डॉ.गुट्टे यांच्या हस्ते करण्यात आले. महाशिवरात्री उत्सवाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात हभप.शिवाजी महाराज आळंदीकर यांच्या कीर्तनाचा उपस्थितांनी लाभ घेतला.
प्रास्ताविक युवा वक्ते संदीप माटेगावकर तर सूत्रसंचालन चैतन्य पाळवंदे यांनी केले. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह परिसरातील भाविक भक्त आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.