पाथरी : मंदीर हे देवतांचे निवासस्थान मानले जाते. आज या ठिकाणी शिव मंदिराचा भुमीपुजन सोहळा संपन्न होत आहे. मनुष्य जीवनात शिव दर्शनाला आध्यात्मिक स्थान प्राप्त आहे. अशा प्रकारे शिव दर्शनाचा योग येथील भाविकांना सदैव लाभणार आहे असे प्रतिपादन ह.भ.प.मनिषानंद महाराज पुरी महाराज यांनी केले. पाथरी शहरातील व्हीआयपी कॉलनी, दत्तनगर येथे आ.बाबाजाणी दुर्राणी यांचे अध्यक्षतेखाली व ह.भ.प.मनिषानंद महाराज पुरी यांचे हस्ते शिव मंदिराचा भूमिपूजन सोहळा रविवारी संपन्न झाला.
याप्रसंगी लेआउटचे मूळ मालक नारायणराव चौधरी, गंगाधरअण्णा गायकवाड, ऍड.मुंजाजीराव भाले पाटील, दत्तात्रय कसबकर, घनश्यामदास कासट, सोपानराव महिपाल, जि.प.माजी सभापती सुभाषराव कोल्हे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अनिलराव नखाते, जि.प.माजी उपाध्यक्षा भावना नखाते यांची उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ह.भ.प.मनिषानंद पुरी महाराज म्हणाले की, चांगल्या कामात विशेषत: धार्मिक कार्यात अनेक अडचणी येत असतात. परंतु सर्व भाविक सामाजिक दायीत्वातून या मंदीराचा कलशारोहन कार्यक्रम लवकर संपन्न करतील असा शुभाशिर्वचन त्यांनी दिले. याप्रसंगी भावना नखाते, नारायणराव चौधरी, बी.बी. कोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी नगरसेवक आलोक चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन किशन डहाळे यांनी तर आभार प्रदर्शन रणजीत शिंदे यांनी केले. याप्रसंगी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. सर्वांसाठीच महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती.
मंदीर उभारणीला २५ लाखाचा निधी : आ.दुर्राणी
भाविकांनी शिवभक्तीचा महिमातून येथे शिव मंदिर उभारण्यासाठी पुढाकार घेतला. यासाठी मी माझ्या आमदार निधीमधून २५ लाख रुपये निधी जाहीर करत आहे. यासोबतच परिसरातील भाविकांनी या मंदिर उभारणीसाठी स्वईच्छेन मदत करण्याची आवश्यकता आहे असे प्रतिपादन आ.बाबाजाणी दुर्राणी यांनी केले. महिलांनी यासाठी विशेष पुढाकार घेऊन या परिसरात भव्य शिवमंदिर, लोकोपयोगी सांस्कृतिक सभागृह आणि सर्व सोयीसुविधा युक्त भव्य गार्डन होईल अशी अपेक्षा आहे असे ते म्हणाले.