परभणी (प्रतिनिधी) : जलसंधारण विभागाचे स्वतंत्र जिल्हास्तरीय कार्यालय परभणी येथे स्थापन करावे, अशी मागणी आमदार डॉ. राहुल पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्याकडे मुंबई येथे भेट घेऊन केली आहे.
परभणी जिल्ह्यामध्ये जायकवाडी, लोअर दुधना आणि येलदरी धरणाचे सिंचन क्षेत्र आहे. अन्य जलसंधारण प्रकल्प जिल्ह्यात असतानाही जलसंधारणा संबंधित परभणी जिल्ह्याचे कार्यालय मात्र जालना जिल्ह्याला जोडले गेले आहे. त्यामुळे जलसंधारण बाबतीत प्रश्न आणि कामाबाबत जालना येथे ये-जा करावी लागते. त्याचा शेतक-यांसह जलसंधारण विभागातील कर्मचा-यांना त्रास होतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
यासोबतच जलसंधारण कार्यालयासाठी कार्यकारी अभियंता, उप अभियंता व अन्य अधिकारी कर्मचा-यांची पदे देखील तात्काळ भरावीत अशी मागणी देखील केल्याचे आ. डॉ.पाटील म्हणाले. यावर या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देवून लवकरच परभणीत कार्यालय सुरू करण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले, असेही त्यांनी सांगितले.