परभणी : प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाची ज्योत महाविद्यालयातून प्रज्वलित करून घेऊन ही ज्ञानाची ज्योत तेवत ठेवावी. पदवी अभ्यासक्रम पूर्ण करत असताना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये झालेले सकारात्मक बदलाचे वर्णन करत सर्व विद्यार्थ्यांचे प्राचार्य डॉ.जया बंगाळे यांनी अभिनंदन केले.
सामुदायिक विज्ञान महाविद्यालय, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी येथील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतीम वर्ष विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य होत्या. या प्रसंगी डॉ.सुनिता काळे, डॉ.माधुरी कुलकर्णी, डॉ.तसनीम नाहीद खान, डॉ.शंकर पुरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा विद्यार्थी शाम कुरे यांनी या महाविद्यालयातून प्राप्त केलेले ज्ञान आपले उज्वल भविष्य घडविण्यासाठी उपयुक्त असून प्रत्येकाने या ज्ञानाचा उपयोग प्रत्यक्षात आणावा असे आपल्या कनिष्ठ बांधवांना सांगितले. या कार्यक्रमात अंतिम वर्षातील विद्यार्थी दिव्या भगत, पल्लवी कच्छवे, गणेश पाटेकर, विकास शिक्रे, सुनील पुरोहित, लवणकुमार गडाम, तेजस चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करीत शिक्षक वृंदासह महाविद्यालयाप्रती ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्रा.नीता गायकवाड, डॉ.इरफाना सिद्दीकी, डॉ.जयश्री रोडगे, डॉ.विद्यानंद मनवर, डॉ.कल्पना लहाडे, डॉ.अश्विनी बिडवे, प्रा.प्रियंका स्वामी, श्रीमती रेखा लाड उपस्थित होते. याप्रसंगी सर्वांनी विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या. हा कार्यक्रम डॉ.जया बंगाळे, सहयोगी अधिष्ठाता व प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.सुनिता काळे जिमखाना उपाध्यक्ष यांनी आयोजित केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमेश शिंदे, माणिक गिरी, राम शिंदे, आलिम शेख यांनी परिश्रम घेतले.