परभणी: जिंतूर येथील मोबाईलचे दुकान फोडून १० लाखाचे मोबाईल लंपास करणा-या तडीपार सराईत गुन्हेगारास सायबर शाखेच्या तांत्रिक मदतीने स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकारी- कर्मचा-यांनी मालेगाव (जि.नाशिक) येथून शनिवारी (दि.21) ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या सराईत गुन्हेगाराकडून २६ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
जिंतूर येथील एक मोबाईल शॉपी फोडून चोरट्यांनी १० लाख रुपयांचे विविध कंपनीचे मोबाईल १० नोव्हेंबर रोजी चोरले होते. या चोरीचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी- कर्मचारी पोलिस अधीक्षक जयंत मीना यांच्या मार्गदर्शनाखाली करत होते. या चोरीप्रकरणी मालेगाव येथील एका सराईत गुन्हेगारावर संशय होता. मात्र, तो गुन्हेगार मोबाईल वापरत नसल्याने तसेच प्रत्येक वेळी तो ठिकाण बदलत असल्याने त्याचा नेमका ठावठिकाणा पोलिसांना लागत नव्हता.
दरम्यान चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी एक मोबाईल मालेगाव परिसरात वापरात येत असल्याचे सायबर शाखेच्या मदतीने निष्पन्न झाले. त्यानंतर जिल्हा पोलिस अधीक्षक जयंत मीना, अतिरीक्त पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक व्यंकटेश आलेवार, कर्मचारी हनुमंत जक्केवाड, शेख अजहर, दिलावर पठाण, संजय घुगे यांचे पथक मालेगाव येथे रवाना झाले.
सायबर शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गुलाब बाचेवाड, कर्मचारी गणेश कौटकर, राजेश आगाशे, श्री.व्यवहारे यांच्या तांत्रिक मदतीने स्थानिक गुन्हे शाखेस हवा असलेला मोहमद मुस्तफा अब्दूल रशीद (वय 34, रा. कमालपुरा मालेगाव, जि.नाशिक) यास शनिवारी मोठ्या शिताफीने मालेगाव येथून ताब्यात घेतले. मोहम्मद मुस्तफा यास मालेगावमधुन तडीपार करण्यात आलेले आहे. पोलिसांना चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी 26 मोबाईल ताब्यात घेण्यात यश आले आहे. अधिक तपास जिंतूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार रवी मुंडे हे करीत आहेत.
सॅनिटायझर प्राशनामुळे सात जणांचा मृत्यू