जिंतूर : शहरापासून जवळच असलेल्या बलसा रोडवर एका धाब्यावर पूर्ववैमनस्यातून भरदिवसा एका २१ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून करून फरार झालेल्या पाच आरोपींविरुद्ध शुक्रवार दि. १५ जुलै रोजी पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी खून प्रकरणातील चार आरोपींना रात्रीच ताब्यात घेऊन दुपारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शहरातील मिर्झा अफरोज बेग, सोमेश्वर चिकटे, योगेश दहिवाल आणि यश राठोड हे चार मित्र बलसा रोडवरील एका धाब्यावर बसलेले असताना पाच मित्रांच्या गटाने संगनमत करून पूर्वनियोजित कट रचून पूर्ववैमनस्यातून २१ वर्षीय मिर्झा अफरोज बेग याच्या पोटात, पाठीवर, मांड्यावर धारदार शस्त्राने वार करून अज्जू उर्फ अफरोज बेग यांची निर्घृण हत्या करून पाच ही आरोपी घटना स्थळावरून पसार झाले होते.
या प्रकरणी निहाल खान याच्या फिर्यादीवरून आरोपी अभिमन्यू साळवे, अभिषेक टाक, नामदेव डोंबे, योगेश मस्के आणि एक अल्पवयीन मुलागा अशा पाच आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये खुनाचा गुन्हा पोलिसात दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी भरदिवसा झालेल्या खुनाच्या प्रकारामुळे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून जिंतूर पोलिसांनी वाढीव पोलिस कुमक तर तैनात केलीच होती. शिवाय या प्रकरणातील चार आरोपीतांना जिंतूर पोलिसांनी तात्काळ अटक करून शुक्रवार दि. १५ जुलै रोजी दुपरी २;३० वाजता न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने आरोपीतांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. यावेळेस न्यायालयासमोरील रस्त्यावर नागरिकांनी एकच गर्दी केली होती. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक दीपक दंतुलवार हे करीत आहे.
आरोपींविरुद्ध मकोकानुसार कारवाईची मागणी
शहरात भरदिवसा काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी मिळून पूर्वनियोजित कट रचून २१ वर्षीय तरुणाची अमानुषपणे धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या केली. या आधीही जिंतूरात सार्वजिनक ठिकाणी असे प्रकार घडले आहे. अशा प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी खून प्रकरणातील आरोपीतांविरुद्ध मकोकानुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका लेखी निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक यांच्याकडे अब्दुल रहेमान लाडले, अब्दुल मुखीद, सिराजोद्दीन नदवी यांनी केली आहे.