26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeपरभणीमानवत बाजार समितीने उभारले कोविड सेंटर

मानवत बाजार समितीने उभारले कोविड सेंटर

एकमत ऑनलाईन

मानवत : राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटर उभारण्याचे आवाहन राज्य सरकारने केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने राज्यातील पहिले 80 बेडचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर उभारले आहे. हे कोविड केअर सेंटर 8 मे रोजी सुरु झाले असून यामुळे आरोग्य विभागावर येणारा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे.

कोरोनाच्या दुस-या लाटेत राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मर्यादा पडत आहेत. हा अतिरिक्त ताण आरोग्य यंत्रणेला सहन करावा लागत आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी परवानगी दिली होती. याला प्रतिसाद देत मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीने तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या समाज कल्याण विभाग मुलींच्या वसतिगृहात या कोविड केअर सेंटरचे उद्घाटन आ.बाबाजानी दुर्रानी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, बाजार समितीचे सभापती पंकज आंबेगावकर, जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे, उपविभागीय अधिकारी दर्शन निकाळजे, तहसीलदार डी.डीफ़ुपाटे, मुख्याधिकारी जयवंत सोनवणे, गटविकास अधिकारी सुहास कोरेगावे, डॉ.अंकुश लाड, पोलीस निरीक्षक रमेश स्वामी, बाजार सहाय्यक निबंधक पाठक, बाजार समितीचे संचालक महादेव नाणेकर, नारायण भिसे, ज्ञानेश्वर मोरे पाटील, बाबासाहेब आवचार, आसाराम निर्मळ, अंबादास तूपसमुद्रे, माणिकराव काळे, गिरिष कत्रुवार, सचिव बालासाहेब कदम आदी उपस्थित होते.

बाजार समितीने सुरू केलेल्या या कोविड सेंटरमध्ये 80 बेडची व्यवस्था केली आहे. सेंटरमध्ये वीज, शौचालय सुविधा उपलब्ध असून रुग्णासाठी भोजनाची तसेच पाण्याची व्यवस्थाही बाजार समितीने केली आहे. तसेच या ठिकाणच्या स्वच्छतेसाठी बाजार समिती पुढाकार घेणार आहे. 9 मे पासून या कोविड केअर सेंटर मध्ये रुग्णांना दखल करता येणार आहे.

राज्यात मानवत कृउबाचा पॅटर्न राबवणार
मानवत बाजार समिती कोविड केअर सेंटर सुरू करणारी राज्यातील पहिली बाजार समिती ठरली आहे. राज्यभरातील इतर बाजार समित्यात मानवत कृषी उत्पन्न बाजार समितीचा हा पॅटर्न राबविण्यात येईल अशी माहिती ऑनलाइन उद्घाटन कार्यक्रमात सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. तसेच या उपक्रमाचे कौतुक केले.

अन्य समित्यांनी पुढाकार घ्यावा : मलिक
परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मानवत बाजार समितीच्या उद्घाटन कार्यक्रमाला ऑनलाइन हजेरी लावली होती. यावेळी मलिक यांनी बाजार समितीने सुरू केलेला हा उपक्रम स्तुत्य असल्याचे सांगत प्रशासनाच्या वतीने आवश्यक मदत करण्यासाठी सर्व सूचना देण्यात आल्याचे यावेळी सांगितले. जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांनी कोविड केअर सेंटरसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन मलिक यांनी केले.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या