पूर्णा : शेतात पाणी देण्यासाठी नदीच्या काठावर लावलेली पाण्याची मोटार काढण्यासाठी नदीत पात्रात गेलेल्या इसमाचा नदी पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे़ बुडालेल्या इसमाचा दोन दिवसा नंतर नदी पात्रात मृतदेह आढळला आहे.
पूर्णा पोलिस सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार शहरातील स्वस्तीक नगर येथील रहिवासी शंकर तातेराव कदम हे दि. १५ जुलै रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास त्यांच्या शेत गट क्रं. ४९ मधील शेतात पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. शेताजवळ असलेल्या पूर्णा नदीच्या पाण्यात असलेली पाण्याची मोटार नदीच्या पुरात वाहून जाऊ नये म्हणून ते मोटार काढून घेण्यासाठी नदी पात्रात गेले होते. यावेळी तोल जावून ते नदीतील पाण्यात पडले आणि पाण्यात बुडाले़ त्यानंतर शोध घेवूनही ते सापडले नाहीत. दोन दिवसा नंतर १७ जुलै रोजी सकाळी ९ वाजता त्यांचा मृतदेह पाण्यात तरंगत असलेल्या अवस्थेत पूर्णा नदीवर उभारण्यात आलेल्या जुन्या रेल्वे पुलाचा डी ९ पिल्लर जवळ आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून श्याम कदम यानी दिलेल्या माहिती वरून पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.