पालम : केरवाडी येथील प्रल्हाद अंबादासराव जाधव यांनी आपला लाडका बैल मृत्यू पावल्यानंतर त्याच्या गोड जेवणाचा कार्यक्रम केला़ विशेष म्हणजे या कार्यक्रमासाठी दुरवरून नातेवाईक आले होते. या कार्यक्रमातून शेतक-याचे बैलाप्रती असलेले प्रेम पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले होते.
येथील शेतकरी गोपाळराव पुरबाजी शिरसकर यांच्या शेतामध्ये दहा-बारा वर्ष काम केलेल्या व घरात भरभराट आणलेल्या बैलास त्यांनी केरवाडी येथील त्यांचे मेहुणे प्रल्हाद अंबादासराव जाधव यांच्याकडे दिले. त्या ठिकाणी आठ वर्ष या बैलाने काम केले व या बैलाच्या पायगुणामुळे त्यांच्याही घरामध्ये खूप भरभराट झाली.
मागील काही दिवसापासून बैल थकल्यामुळे त्याचे काम बंद झाले होते़ या बैलाचा १५ जानेवारी रोजी मृत्यू झाला. त्या बैलाचा विधिवत अंत्यविधी करण्यात आला आणि २८ जानेवारी रोजी बैलाचा तेरावी कार्यक्रम करून महादेवाला अभिषेक करून पाहुणेरावने बोलाऊन जेऊ घातले आणि २९ जानेवारी रविवारी गोड जेवणाचा कार्यक्रम केला.
या कार्यक्रमासाठी अनेक पाहुणे मंडळी आली होती़ या बैलामुळे दोन्ही घरात भरभराट झाल्याने दोन्ही शेतक-यांचा या बैलावर अतोनात जीव होता. या कार्यक्रमामुळे शेतक-याचा मुक्या जनावरावर किती जीवापाड प्रेम असते हे पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले आणि हे अनोख्या गोड जेवनाची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे.