मोहन धारासूरकर परभणी : जिल्हयात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत .असून औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या नवीन इमारतीमध्ये कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्ण उपचार घेत आहेत. या रुग्णांना शासनाच्यावतीने दररोज जेवण दिले जाते. १२ रोजी रुग्णांना जेवणात भात देण्यात आला. या भातामध्ये चक्क मेलेले मुंगळे असल्यामुळे रुग्ण संतप्त झाले. काही रुग्णांनी तातडीने या पाकिटांचे फोटो काढून जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांना व्हॉटसअपद्वारे पाठविले. यावर जिल्हाधिका-यांनी कारवाई केली जाईल असे या रुग्णांना सांगून शांत केले आहे.
दरम्यान, रुग्णांना निकृष्ठ जेवण दिले जात असल्याने रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या आहेत. रुग्णांनी स्वत:च या जेवणाचा पंचनामा करून त्याच्यावर स्वाक्ष-या करून त्याची प्रत जिल्हाधिका-यांना पाठविली आहे.
जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा आणखी सुसज्ज करण्याचे प्रयत्न प्रशासनाने चालवले असून शासकीय रुग्णालयासह वीस खाजगी रुग्णालयेही लवकरच करोनावर उपचार करण्यासाठी कार्यान्वित होत आहेत. आजच्या बैठकीत जिल्हाधिका-यांना काही खासगी डॉक्टरांनी प्रस्तावही दिले. बेंगलोरहून २७ व्हेंटिलेटर रवाना झाले आहेत.
सरकारी दवाखान्यातील अतिदक्षता विभागात सध्या ३२ व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. बेंगलोरहून उद्यापर्यंत उपलब्ध होणारे
व्हेंटिलेटर आवश्यकता व मागणी प्रमाणे तालुक्यांच्या ठिकाणांनाही उपलब्ध करून दिले जातील असे जिल्हा प्रशासनाच्यावतीने सांगितले.
महापालिकेने सद्य:स्थितीत शहरात चार सेंटर्स सुरू केले आहेत. सिटी क्लब, उद्देश्वर विद्यालय, रोकडा हनुमान मंदिर आणि आयएमए हॉलमध्ये हे सेंटर असून तेथे मोठ्या संख्येने व्यापारी, विक्रेत्यांची गर्दी होताना दिसून येत आहे. अनेकांना टेस्टसाठी तासनतास ताटकळत बसावे लागत आहे. त्यातून कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्यादेखील झपाट्याने वाढल्याचे चित्र आहे. त्यामुळे विभागीय आयुक्तांच्या सूचनेवरून महापालिकेनेदेखील शहरात दहा ते बारा सेंटर करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यात एकूण सहा जणांचा मृत्यू झाला. यातील पाच जण परभणी शहरातील तर एकजण पुर्णा शहरातील आहे. यामध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. मृतांमध्ये मुमताज नगर येथील ६४ वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील ६५ वर्षीय पुरुष, कालाबावर येथील ६५ वर्षीय पुरुष, वडगल्ली येथील ५९ वर्षीय पुरुष, हर्ष नगर येथील ५५ वर्षीय महिलेचा आणि पुर्णा शहरातील सिध्दार्थ नगर येथील ७५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ६० इतकी झाली आहे.
अन्य फ्रँचायझी नाराज : शाहरूखच्या संघाला विशेष ‘सूट’?