परभणी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी व महानगरपालिका यांच्या वतीने शुक्रवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ६.३० वा. आयोजित सायकल रॅलीत जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्यासह विविध विभागाच्या अधिका-यांनी तसेच क्रीडाप्रेमी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला होता. या रॅलीचे शहरातील प्रत्येक रस्त्यावरून जाताना नागरिकांनी जोरदार स्वागत करीत रॅलीत सहभागी झालेल्यांना प्रोत्साहन दिले. या रॅलीमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात या सायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवून सुरूवात करण्यात आली. ही सायकल रॅली बसस्थानक, उड्डाणपुल, जिंतूर रोड, दर्गारोड कमान, शासकीय दवाखाना, शिवाजी चौक, गांधी पार्क, नारायणचाळ, म.फुले पुतळा, प्रशासकीय इमारत मार्गे वसमतरोडवरील वसंतराव नाईक यांचा पुतळा, विद्यापीठ गेट, खानापुर फाटा मार्गे ही सायकल रॅली परत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परीसरात आल्यावर समारोप करण्यात आला. ही रॅली सुरू असताना वंदे मातरम, भारत माता की जय अशा राष्ट्र भक्तीवर घोषणा देण्यात आल्या. या सायकल रॅलीच्या उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी आंचल गोयल, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, मनपा आयुक्त देविदास पवार, जिल्हा माहिती अधिकारी, क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार, अॅड. अशोक सोनी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.