चारठाणा : जिंतूर – जालना महामार्गावरील चारठाणा टी.पॉईंन्ट जवळील बिअरबार फोडून चोरट्यांनी ६५ हजारांची विदेशी दारू व रोख २५ हजार असा ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्यांचा छडा लावण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते.
चारठाणा टि.पॉईंन्ट जवळ प्रकाश देशमुख यांचे हॉटेल व बिअरबार आहे. नेहमी प्रमाणे सोमवारी रात्री दहाच्या सुमारास बार बंद करून प्रकाश देशमुख घरी गेले. दरम्यान सोमवारच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी पाठीमागील दरवाज्याचे कुलुप तोडून आत प्रवेश करून चोरी केल्याचा प्रकार घडला.
मंगळवारी बारवर गेले असता दरवाजा उघडा दिसला. आत जाऊन पाहणी केली असता आरएस दारूचे तिन बॉक्स, आर.सी.चा एक बॉक्स, आयबीचे पाच बॉक्स असा एकुण जवळपास ६५ हजारांची विदेशी दारू व गल्ल्यातील २५ हजार रुपये रोख असा एकुण ९० हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या घटनेची माहिती प्रकाश देशमुख यांनी चारठाणा पोलीसांना दिल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, पोलीस नाईक विष्णूदास गरूड, शेख याकुब, पो.कॉ.पवन राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
घटनास्थळी महेबूब पठाण, पो.हे.कॉ. मारूती बुथवाडे, पो.कॉ.वचिष्ट बिकड यांचे पथक दाखल झाले होते. चोरीच्या घटनेनंतर परभणी येथील ठसे तज्ञांनी घटनास्थळी भेट देऊन बिअरबार मधील ठशांचे नमुने घेतले आहेत. दोन जणांचे ठशांचे नमुने घटनास्थळावरून प्राप्त झाले असून हे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. ठशांचा अहवाल आल्यानंतर या चोरट्यांचा सुगावा लागेल अशी माहिती पोलीस सूत्राकडून देण्यात आली.