24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeपरभणीकारमध्ये सापडला सव्वादोन क्विंटल गांजा

कारमध्ये सापडला सव्वादोन क्विंटल गांजा

एकमत ऑनलाईन

पाथरी : पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू असल्याचे दिसताच पळून जाणा-या कारला पोलिसांनी आठ किलोमीटर पाठलाग करीत पकडले़ कारची तपासणी केली असता गाडीत सव्वादोन क्विंटल गांजा आढळून आला. ही कारवाई शुक्रवारी पहाटे ४ वाजता करण्यात आली़ या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली असून एक जण फरार झाला.

पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार बीडकडे जाणा-या हुंडाई कार क्र. एम.एच.०३ बी.सी.५०३२ या कार चालकाला शहरातील सेंट्रल नाका परिसरात पोलीस वाहनाची तपासणी करत असल्याचे दिसले़ ते पाहून कार चालकाने कार परत फिरवली़ ही बाब पोलिसांच्या लक्षात येताच पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. वेगाने जाणा-या कारला शहरापासून ७ किलोमीटर अंतरावर बोरगव्हान येथे गतिरोधकावर आदळली़ यात कारचे चेंबर फुटल्याने कार चालकाने गाडी रस्त्याच्या खाली घेतली.

यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी चोर असल्याच्या अंदाजाने कार जवळ जाऊन पाहिले असता गाडीतील कोणीही बाहेर आले नाही. याच वेळी पाठलाग करणारे पोलीस पथक त्या ठिकाणी पोहचले़ पोलिसांना पाहताच कार चालक बाळू श्रीरंग चोरमले फरार झाला. पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीत गांजा आढळून आला. घटनेचे गांभीर्य पाहून पोलिस निरीक्षक वसंत चव्हाण घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान सकाळी शासकीय पंचा समक्ष पोलिसांनी पंचनामा केला असता गाडित दोन क्विंटल २६ किलो अंदाजे ११ लाख ३० हजार रूपयांचा गांजा सापडला़

सहाय्यक पोलीस निरीक्षक सोंमवशी यांच्या फियार्दीवरून अमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून कार मधील मारोती रामराव गोलेगावे रा.समर्थ साखर कारखाना ता़आंबड जि़जालना व शीला संतोष रहाडे रा.रुई धानोरा ता. गेवराई यांना अटक करण्यात आली़ घटनेटचा तपास पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण करीत आहेत.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या