मानवत : खताचा काळाबाजार थांबवून लिकिंग खत विक्री बंद करावी अशी मागणी नायब तहसीलदार नकुल वाघुंडे यांच्याकडे दि़२४ जून रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे़ याकडे त्वरीत लक्ष देवून खताचा काळाबाजार न थांबवल्यास कृषी कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, मानवत तालुक्यातील शेतक-यांना १०:२६:२६ व डी.ए.पी खत मिळत नाही. परंतु काही दुकानदार लिंकिंग पद्धतीने विक्री करत आहेत १०:२६: २६ या खाताचा बॅग सोबत नॅनो बॉटल एक खरेदी करा नाही तर आमच्याकडे खत उपलब्ध नाही असे म्हणत शेतक-याला सक्ती करून वेठीस धरत आहेत. जे दुकानदार शेतक-यांना सक्ती करत आहेत त्यांचा परवाना रद्द करण्यात यावा व तालुक्यात होणा-या काळ्या बाजारातील खत विक्रीची संपूर्ण चौकशी करण्यात यावी़ संबंधित तालुका कृषि अधिकारी व पंचायत समिती कृषी अधिकारी याकडे दुर्लक्ष करत असून फोनही उचलत नसल्याचा आरोप या निवेदनात करण्यात आला आहे.
यामुळे २७ जून रोजी मानवत कृषी कार्यालयास ताळे ठोक आंदोलन करण्यात येणार असल्याचेही निवेदनात म्हटले असून निवेदनावर कॉ.रामराजे महाडिक, हनुमान मसलकर, विठ्ठल चौखट, हनुमान तारे, नारायण आवचार, माऊली निर्वळ, विष्णू जाधव यांच्यासह पदाधिकारी व शेतक-यांच्या स्वाक्ष-या आहेत.