पूर्णा : सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या मारहाणीस व जाचास कंटाळून लोचना ज्ञानेश्वर पवार(३२) या विवाहित महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना पूर्णा तालुक्यातील आव्हई येथे घडली. या घटनेची माहिती विवाहितेच्या माहेरी समजताच ते गाड्या घेऊन आव्हाई येथे दाखल झाल्याने गावात तणाव निर्माण झाला होता. दरम्यान सासरचे लोक फरार झाले असून या प्रकरणी पूर्णा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोचना पवार यांना नवरा ज्ञानेश्वर पवार, सासु सखुबाई व सासरा उद्धव पवार हे माहेराहून पैसे घेऊन ये म्हणून सतत मारहाण करत होते. काही महिन्यांपूर्वी या त्रासास कंटाळून लोचना यांनी विषारी औषध प्राशन केले होते. त्यानंतर नातेवाईकांनी मध्यस्थी करून हे प्रकरण मिटवले होते. परंतू सासरच्या मंडळीचा जाच कमी होत नसल्याने लोचना यांनी टोकाचे पाऊल उचलत शुक्रवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आपल्या राहत्या घरी छताच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
सदरील घटना ही तीच्या मुलाने ग्रामस्थांना कळवली. घटना घडताच पती ज्ञानेश्वर, सासु सखुबाई, सासरे उद्धव पवार गावातून पसार झाले आहेत. घटनेची माहीती पोलिस पाटील संदीप सोनवणे यांनी पूर्णा पोलिसांना दिली. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ नानाराव भाऊराव जामगे रा. पुयणी ता. वसमत जि. हिंगोली यांच्या फिर्यादीवरून पती, सासु, सासरे या तीघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.