जिंतूर : शहरातील गणेश नगर येथील डॉक्टर महिलेवर भर दिवसा दोन जणांनी चोरीच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवार, दि. २५ जुलै रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली़ या हल्ल्यात डॉ. ज्योती सांगळे यांच्या बोटाला व गळ्यावर जबर दुखापत झाली आहे. या हल्लातील एका आरोपीस अटक केली असल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील गणेश नगर भागात डॉ. गणेश सांगळे हे आपल्या कुटुंबासह राहतात. डॉ. ज्योती सांगळे या कपडे धुत असताना दोन अनोळखी व्यक्तींनी तोंडाला कापड बांधून घरात प्रवेश केला. यावेळी डॉ. ज्योती सांगळे यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून गळ्याला चाकू लावत धमकावले़ याच वेळी घरात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या मुला जवळ हल्लेखोर जाताच हल्लेखोर व डॉ़ ज्योती सांगळे यांच्यात झटापट झाली़.
यामध्ये त्यांच्या बोटाला व गळ्यावर जबर दुखापत झाली आहे़ यावेळी डॉ. ज्योती सांगळे यांनी आरडाओरड केल्यामुळे दोन्ही हल्लेखोरांनी पळ काढला़ यावेळी आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना माहिती दिली परंतू हल्लेखोर पसार झाले होते. मात्र पोलिसांनी प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन तपासाची चक्रे फिरवून एका संशयित आरोपीस अटक करण्यात यश मिळवले आहे. डॉ. ज्योती सांगळे यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.