परभणी : औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योगांना थकीत मालमत्ता करापोटी सील ठोकण्यात आले आहे. परंतू ही कारवाई कोणतीही नोटीस न देता तसेच पंचनामा न करता करण्यात आल्याचा आरोप करीत या विरोधात शनिवार, दि.०१ एप्रिल पासून जिल्हा उद्योजक संघटनेच्या वतीने कामबंद आंदोलन आंदोलन पुकारण्यात आले आहे.
या आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीतील कामकाज ठप्प पडल्याचे दिसून आले. शहरातील औद्योगिक वसाहतीतील दोन उद्योगांना थकीत मालमत्ता करापोटी सील ठोकण्यात आले आहे. ही कारवाई बेकायदेशीर असून सील करताना कोणालाही नोटीस न देता व पंचनामा न करता ही कारवाई केल्याचा आरोप करीत या प्रकरणी मनपा आयुक्तांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संघटनेच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांना शुक्रवारी निवेदन देण्यात आले होते.
या विरोधात शनिवार पासून कामबंद आंदोलन करण्याचा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आला होता. मालमत्ता कर संदर्भात उच्च न्यायालय खंडपीठात याचिका दाखल केली असून तो निर्णय प्रलंबित आहे. तसेच एसटी महामंडळाच्या कारवाई संदर्भातही अपील दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी न्यायालयाने मनपाला सील करण्याचा अधिकार नसल्याचे आणि तसा कायदा नसल्याचा निर्णय दिला असल्याचे या निवेदनात नमुद करण्यात आले होते.
त्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कारवाई चुकीची असून या विरोधात शनिवार पासून आंदोलन करण्याचा इशारा ओमप्रकाश डागा, आशिष फुलवाडकर, प्रमोद वाकोडकर, एकनाथ वट्टमवार, प्रवीण चक्रावार, अरूण पाटील, विजय अडकिणे, संजय पाठक आदींनी दिला होता.
या प्रकरणी जिल्हा उद्योजक संघटनेने आपापले उद्योग बंद ठेवत शनिवार पासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाबाबत उद्योजकांनी आपल्या उद्योगाच्या गेटवर त्या संदर्भात पाटी लावल्याचे आढळून आले. या आंदोलनामुळे औद्योगिक वसाहतीत कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले.