पालम : तालुक्यातील कापसी येथे सततच्या नैराश्य व कर्जबजारीपणाला कंटाळून एका २७ वर्षीय तरुण शेतक-याने राहत्या घरी गळफास घेवून जीवनयात्रा संपवल्याची घटना ०८ जुलै रोजी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेची माहिती शनिवार, दि़०९ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली़ या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे.
आत्महत्या करणा-या शेतक-याचे नाव मुंजाजी तुकाराम शिंदे असे आहे. त्यांना कापसी शिवारात ०१़५० एकर जमीन असून त्यांच्या नावे पीककर्ज आहे. तसेच आर्थिक व्यवहार सांभाळताना त्यांना मोठ्या प्रमाणात खासगी देणी झाली होती. शेतात निघणारे उत्पादन कमी व कर्ज जास्त झाल्याने ते मागील अनेक दिवसांपासून नैराश्याच्या गर्तेत सापडले होते.
८ जुलै रोजी रात्री सर्व झोपले असताना मुंजाजी शिंदे याने गळफास घेवून जीवन संपवले आहे. त्यांच्या आईला ९ जुलै रोजी सकाळी ६ वाजता जाग आल्यावर ही घटना उघडकीस आली. पालम येथे ग्रामीण रुग्णालयात शव विच्छेदन करून कापसी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील असे कुटुंब आहे.