बोरी : कर्जबाजारीपणा आणि कर्ज फेडण्याचा विवंचनेत बोरीमध्ये एका २३ वर्षीय तरुण शेतक-याने लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. मयत शेतक-याचे नाव श्रीकांत अनिल चौधरी, रा.पेठगल्ली, बोरी असे आहे.
बोरी येथील पेठ गल्लीमधील रहिवासी तरुण शेतकरी श्रीकांत चौधरी यांच्यावर बोरी येथील स्टेट बँक ऑफ इंडीया शाखेचे ०१ लाख ४० हजार रुपये कर्ज होते़ हे कर्ज कसे फेडावे या चिंतेत ते होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून श्रीकांत चौधरी यांनी स्वत:च्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. सदर बाब रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी पंचनामा करून मयताच्या भाऊ देवशिष चौधरी यांच्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. मयतावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत शेतक-याच्या पश्चात आई, बहीण, भाऊ, वहिनी असा परिवार आहे.