जिंतूर : बामणीपासून २ किमी अंतरावर असलेल्या कोल्पा येथे २५ वर्षीय तरूणाने आत्महत्या केल्याची घटना रविवारी दुपारी २ च्या सुमारास घडली आहे. कोल्पा येथील अरुण लक्ष्मण सातपुते (वय २५) याने रविवारी दुपारी आत्महत्या केल्याची घटना घडली.
अरुण सातपुते याला वडील नाहीत. अरुणसह आई, भाऊ आणि भाऊजई परळी तालुक्यात सालगडी म्हणून शेती काम करीत होते़ दोन दिवसांपूर्वीच अरुण स्वत:च्या गावी कोल्पा येथे आला होता. याने गावालगत आपल्या शेताच्या रस्त्यावर ओढ्याच्या कडेला लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास लावून रविवारी दुपारी आत्महत्या केली आहे.
ही घटना शेतातील लहान मुलांनी पाहून गावात सांगितली़ त्यावेळी गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनास्थळी पोलिस निरीक्षक भुमे, बिट जमादार भगवान सोडगिर व विजय पिंपळे, चालक देशपांडे यांनी पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली़ पुढील तपास पोलिस करीत आहेत.