मुंबई : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राज्यसभा खासदार झाल्यानंतर पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्था’वर जाऊन भेट घेतली आहे. या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. याआधी रोहित पवार यांनीही राज ठाकरे यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. आता पार्थ पवार यांनी मनसे अध्यक्षांची भेट घेतली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेली राजकीय परिस्थिती आणि पक्षाच्या भवितव्याच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या संदर्भात सुरू असलेल्या कायदेशीर आणि राजकीय घडामोडींवर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्यामध्ये चर्चा होणार असल्याचे समजते. राज ठाकरे यांचा राजकीय अनुभव दांडगा आहे. यापूर्वी रोहित पवार यांनीही त्यांची भेट घेतली होती, त्यावेळी राज ठाकरेंनी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या काही गाईडलाईन्स समजावून सांगितल्या होत्या. आता पार्थ पवार देखील दिल्लीतील राजकारणात सक्रिय होताना राज ठाकरेंचे मार्गदर्शन घेण्यासाठी पोहोचल्याचे समजते. अजित पवार यांच्या अनुपस्थितीत पक्षाची पुढील वाटचाल आणि अंतर्गत राजकारण यावरही या भेटीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पार्थ पवार राज्यसभा खासदार झाल्यानंतर राज ठाकरेंसोबतची त्यांची ही पहिलीच भेट आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांचे अजित पवारांच्या कुटुंबाशी जिव्हाळ्याचे संबंध राहिले आहेत. भेटीचे अधिकृत कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी अनेक राजकीय विषयांवर यात खलबते होण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्या या भेटीमुळे आगामी काळात मनसे आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्यात काही नवीन राजकीय समीकरणे किंवा युती पाहायला मिळणार का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

