नवी दिल्ली : मुंबई विमानतळावर काही प्रवासी धावपट्टीवर बसून जेवण करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. याची गंभीर दखल नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने घेतली. यासंदर्भात मंत्रालयाने इंडिगो आणि मुंबई एअरपोर्टला नोटीस बजावली. दोन्ही पक्षांना यासंदर्भात स्पष्टीकरण देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
निर्धारित वेळेमध्ये माहिती दिली गेली नाही, तर कडक कारवाई करण्यात येईल. यात आर्थिक दंडाचा देखील समावेश असेल, असा सक्त इशारा मंत्रालयाने घेतला. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी मंगळवारी सकाळी यासंदर्भात बैठक घेतली होती. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला असून नोटीस बजावण्यात आली.
प्रवाशांची योग्य काळजी न घेतल्याप्रकरणी मंत्रालयाने नाराजी व्यक्त केली. मंत्रालयाने मुंबई विमानतळ प्रशासन आणि इंडिगो कंपनी या दोघांना या घटनेसाठी जबाबदार धरले. परिस्थितीबाबत योग्य अंदाज न बांधणे आणि प्रवाशांना योग्य सुविधा न पुरवणं या गोष्टींसाठी दोघेही कारणीभूत असल्याचं मंत्रालयाकडून म्हणण्यात आले.
मुंबई विमानतळाने प्रवाशांना विश्रांती कक्ष आणि रिफ्रेशमेंट सुविधेचा लाभ घेऊ दिला नाही. त्यांना धावपट्टीवर थांबावे लागले. यावेळी सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले असं मंत्रालयाने म्हटले. यासंदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यात प्रवासी रनवेवर बसले होते आणि याच ठिकाणी ते जेवण करत होते. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावरुन याबाबत नाराजी व्यक्त केली होती.