नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात ३० ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी प्रस्तावित आंदोलनावरून काँग्रेसने दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. आंदोलनासाठी दिल्लीतील अशोका हॉटेल आणि रामलीला मैदान या दोन्ही ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवणे आणि निवडणूक व्यवस्था अधिक पारदर्शक करणे, हा आंदोलनाचा उद्देश असल्याचे काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी सांगितले.
काँग्रेसकडून १ नोव्हेंबरला ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सार्वजनिक महाभियोग कार्यक्रम आयोजित करण्याची तयारी सुरू आहे. ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवले जात नाही, तोपर्यंत पक्षाचे आंदोलन सुरूच राहील, असा इशारा वेणुगोपाल यांनी दिला. के. सी. वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने सुरुवातीला अशोका हॉटेलमध्ये कार्यक्रम आयोजित करण्याचे नियोजन केले होते. हॉटेल व्यवस्थापन कार्यक्रमासाठी तयार होते; मात्र, दिल्ली पोलिसांनी परवानगी देण्यास नकार दिला. त्यानंतर रामलीला मैदानात कार्यक्रम घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली. पण तिथेही परवानगी मिळाली नसल्याचा दावा त्यांनी केला. वेणुगोपाल यांनी सांगितले की, रामलीला मैदानावर कार्यक्रम आयोजित करण्यासाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीसाठी परवानगी मागण्यात आली होती. या कालावधीत मैदानावर कार्यक्रम घेण्याची तयारी सुरू असतानाही पोलिसांनी अडथळा आणल्याचा आरोप त्यांनी केला.
परवानगी नाकारण्यामागे मोदी आणि शाह
काँग्रेसच्या सरचिटणीसांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही आरोप केले. रामलीला मैदानावर कार्यक्रमाची तयारी सुरू असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखल्याचा दावा करत, हा निर्णय दिल्ली पोलिसांचा स्वतंत्र निर्णय नसून केंद्र सरकारच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या निर्देशांनुसार घेण्यात आल्याचा आरोप वेणुगोपाल यांनी केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, काँग्रेसने १ नोव्हेंबरला मोर्चा काढण्याची योजना आखली होती. त्यासाठी २५ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीसाठी रामलीला मैदानाचे आरक्षण करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
मोदी-शाह इतके घाबरले आहेत का?
कार्यक्रमासाठी मंडप उभारण्याकरिता दोन दिवस आधी काँग्रेसचे कार्यकर्ते मैदानावर पोहोचले असता पोलिसांनी त्यांना रोखल्याचे वेणुगोपाल यांनी सांगितले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्यावर टीका केली. ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा इतके घाबरले आहेत की त्यांना एक छोटी सभा देखील होऊ द्यायची नाही, हे आम्हाला समजत नाही. आम्ही ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात सार्वजनिक महाभियोग कार्यक्रमाची घोषणा केली होती असे वेणुगोपाल म्हणाले.
परवानगी नाकारण्याचे कारणही सांगितले नाही
कार्यक्रमाच्या तयारीदरम्यान पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रोखले, मात्र त्यामागील कारण सांगितले नाही, असा आरोप वेणुगोपाल यांनी केला. हा निर्णय दिल्ली पोलिसांनी स्वतंत्रपणे घेतलेला नसून केंद्र सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाचा असल्याचा दावा त्यांनी केला.
आम्ही दबावापुढे झुकणार नाही
आम्ही त्यांच्या दबावापुढे झुकणार नाही. कार्यक्रम कसा करायचा, हे आम्हाला माहीत आहे. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी अनेक ठिकाणे आहेत. दिल्ली पोलीस आम्हाला कसे रोखू शकतात?’ असा सवाल वेणुगोपाल यांनी उपस्थित केला.
















