Homeअंतरराष्ट्रीयरशियन तेलासाठी फिलीपिन्सला सूट

रशियन तेलासाठी फिलीपिन्सला सूट

ट्रम्प यांची अचानक उदारता कशासाठी?

वॉशिंग्टन : मध्य पूर्वेतील सध्याचा तणाव आणि जागतिक ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेने फिलीपिन्सला मोठा दिलासा दिला आहे. फिलीपिन्सने काही दिवसापूर्वी अमेरिकेकडे रशियाकडून तेल खरेदी करण्यासाठी परवानगी देण्याची विनंती केली होती, याला प्रतिसाद देत, अमेरिकेने रशियन तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करण्यासाठी तात्पुरती सूट दिली आहे. गेल्या आठवड्यात, तेलाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी ट्रम्प यांनी रशियन तेल खरेदीवरील ही सूट वाढवली. याचा फायदा भारतालाही होत आहे, पण फिलीपिन्सला त्याहूनही अधिक दिलासा देण्यात आला आहे.

फिलिपाइन्सच्या ऊर्जा विभागाच्या माहितीनुसार, ही सूट १७ एप्रिल ते १६ मे पर्यंत लागू राहील. यापूर्वी मार्च महिन्यात अमेरिकेने ३० दिवसांची सूट दिली होती, ही ११ एप्रिल रोजी संपली. या नवीन सवलतीमुळे फिलिपाइन्सला आपल्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तात्पुरता दिलासा मिळेल. ऊर्जा विभागाचे उपसचिव अलेसँड्रो सेल्स म्हणाले की, जागतिक तेल पुरवठ्यावर परिणाम होत असताना हा निर्णय घेण्यात आला आहे. ऊर्जा सचिव शॅरन गॅरिन म्हणाल्या की, देशाकडे सध्या अंदाजे ५४ दिवसांचा इंधनसाठा आहे, पण सद्यस्थिती पाहता अतिरिक्त पर्यायांची आवश्यकता होती.

तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम
संघर्षामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीतील तणावामुळे तेल आणि वायू पुरवठ्यावर परिणाम झाला आहे, यामुळे अनेक देशांना पर्यायी स्रोत शोधण्यास भाग पडले आहे.

फिलिपिन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनियर यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रीय ऊर्जा आणीबाणी जाहीर केली आहे. देशात ऊर्जेचा पुरवठा स्थिर ठेवणे आणि संभाव्य संकट टाळणे, हा या उपायाचा उद्देश आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR