बंगळूरु : बंगळुरूच्या परप्पना अग्रहारा मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सेंट्रल क्राइम ब्रांचने छापा टाकला. यामध्ये माजी खासदार प्रज्वल रेवन्नाकडे मोबाईल आणि पेन ड्राइव्ह सापडला आहे. कारागृहाचे डीजीपी आलोक कुमार यांनी बुधवारी ही माहिती दिली.
त्यांनी सांगितले की, सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. मध्यवर्ती कारागृहाच्या एसपींना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे आणि सहाय्यक अधीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. रेवन्ना हे जनता दल (सेक्युलर) चे आमदार एच.डी. रेवन्ना यांचे पुत्र आणि माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचे नातू आहेत. ते बलात्कार प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. गेल्या वर्षी, रेवन्नाचे २,००० हून अधिक अश्लील व्हीडीओ क्लिप सोशल मीडियावर समोर आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत रेवन्नाने कर्नाटकातील हासन संसदीय मतदारसंघात दुस-यांदा निवडणूक लढवली होती, परंतु तो आपली खासदारकी वाचवू शकला नाही. त्याच्याविरुद्ध दाखल झालेल्या प्रकरणांनंतर जेडीएसने त्याला पक्षातून निलंबितही केले होते.
















