नवी दिल्ली : २०२९ च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारी सुरू केल्याचे समोर आले आहे. देशात सध्या किती मतदान यंत्रे उपलब्ध आहेत आणि आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी आणखी किती यंत्रे खरेदी केली जाणार आहेत, याबाबत माहितीच्या अधिकाराअंतर्गत निवडणूक आयोगाकडे माहिती मागवली होती. आयोगाने दिलेल्या उत्तरातून २०२९च्या निवडणुकीसाठी मतदान केंद्रे आणि ईव्हीएमची व्यवस्था करण्याचे नियोजन सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, २०२९ ची लोकसभा निवडणूक देशभरातील सुमारे १५.३८ लाख मतदान केंद्रांवर होण्याची शक्यता आहे. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत देशात १०.५२ लाख मतदान केंद्रे होती. त्याच्या तुलनेत २०२९ मध्ये मतदान केंद्रांची संख्या सुमारे ४६ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.दरम्यान, मतदान केंद्रांची संख्या वाढण्याची शक्यता आणि जुन्या ईव्हीएमच्या जागी नव्या यंत्रांची प्रस्तावित खरेदी पाहता, २०२९च्या लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाची तयारी आतापासूनच सुरू झाल्याचे या माहितीमधून समोर आले आहे.
आयोगाकडे सध्या किती ईव्हीएम?
उत्तरात निवडणूक आयोगाने सांगितले की, सध्या त्याच्याकडे सुमारे ३०.४८ लाख बॅलेट युनिट आणि २१.९२ लाख कंट्रोल युनिट उपलब्ध आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयोगाकडे सुमारे १४.८८ लाख बॅलेट युनिट आणि ११.३० लाख कंट्रोल युनिट होती. म्हणजेच गेल्या काही वर्षांत निवडणूक आयोगाकडील ईव्हीएमचा साठा मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
नवे ईव्हीएम खरेदी करणार
२०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी निवडणूक आयोग ३.५७ लाख बॅलेट युनिट आणि १.२५ लाख कंट्रोल युनिट खरेदी करण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे, नव्या यंत्रांची खरेदी करण्याबरोबरच जवळपास एवढ्याच संख्येतील जुन्या मशीन निवृत्त करण्याची योजनाही आयोगाने सांगितली आहे. याचा अर्थ आयोगाचा उद्देश ईव्हीएमची एकूण संख्या मोठ्या प्रमाणावर वाढवणे नसून जुन्या मशीनच्या जागी नव्या मशीन आणण्याचा आहे. त्यामुळे ३.५७ लाख बीयू आणि १.२५ लाख सीयूची प्रस्तावित खरेदी ही जवळपास वन-टू-वन रिप्लेसमेंट स्वरूपाची असेल.
खरेदीसाठी ४८६ कोटींचा खर्च
निवडणूक आयोगाच्या अंदाजानुसार, २०२९च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनच्या खरेदीवर सुमारे ४८६ कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. यंत्राच्या माध्यमातून मतदाराने ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याची माहिती असलेली कागदी पावती काही क्षणांसाठी मशीनमधील पारदर्शक खिडकीत दिसते. त्यानंतर ही पावती आपोआप एका सीलबंद पेटीत जमा होते.
















