धुळे : मराठा आरक्षणप्रश्नी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी वीस जानेवारीला ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. यात मराठा समाजाच्या राजकीय नेत्यांनी मदत न केल्यास त्यांच्यावर राजकीय बहिष्काराचा निर्णय घेत त्यांना निवडणुकीत धडा शिकविला जाईल, असा इशारा जिल्हा सकल मराठा समाजाने बैठकीतून दिला.
जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळण्यासाठी सकल मराठा समाजाला २० जानेवारीला ‘चलो मुंबई’चा नारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे सकल मराठा समाजातर्फे बैठक झाली. यात जिल्ह्यात ठिकठिकाणी जनजागृती करणे, बैठका घेणे, आरक्षण लढ्याबाबत प्रचार-प्रसार करणे, मराठा समाजबांधवांच्या घरोघरी पोहोचणे व जागृती करणे, जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामीण भागातही बैठकांद्वारे वीस जानेवारीबाबत प्रचार व प्रसार करण्याचा निर्णय झाला.
मराठा समाजाचे जे कुणी राजकीय नेते असतील. नगरसेवक, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आमदार, भावी आमदार, खासदार व इच्छुक उमेदवार असतील त्यांनी आरक्षण लढ्याबाबत मराठा समाजाला मदत करावी. वीस जानेवारीच्या ‘चलो मुंबई’त मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे.
आरक्षणासंदर्भात मदतीसाठी समाजबांधव अधिकाधिक संख्येने सामील होतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यावर भर देण्याचे ठरले. जो कुणी मराठा समाजाचा राजकीय व्यक्ती मदत करणार नाही, त्यास निवडणुकीवेळी मदत करू नये. त्यांना मतदान करू नये, त्याच्यावर बहिष्कार टाकावा, असा निर्णय बैठकीत झाला.
मराठा आरक्षणासाठी जो मदत करेल, त्याच व्यक्ती किंवा उमेदवाराला समाधानाने मदत करायची आहे. आरक्षणाच्या लढाईत स्वत:ला वाहून घेणा-या राजकीय व्यक्तींना समाजाने सहकार्य करायचे आहे, असे बैठकीत ठरले. तसेच दहा ते पंधरा हजार समाजबांधवांना मुंबईला जाण्यासाठी व्यवस्था करावी.
त्यात बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रक, आयशर, मिनी ट्रक, तसेच रुग्णवाहिका, पाणी टँकर आदी वाहने, किराणा, तांदूळ, गहू, तेल किमान पंधरा दिवस पुरेल, अशा पद्धतीने सोबत ठेवावे. यात थंडीमुळे स्वेटर, हातमोजे, पायमोजे, औषधे सोबत ठेवावीत, असे आवाहन जिल्ह्यातील समाजबांधवांना बैठकीतून झाले.
आंदोलन यशस्वितेचा निर्धार
जरांगे पाटील यांच्या तीन डिसेंबरच्या येथील सभेबाबत बैठकीत हिशेब सादर झाला. यासंबंधी आवक व जावक मांडण्यात आले. ज्या राजकीय, सामाजिक, सकल मराठा समाजातील कार्यकर्ते, समाजबांधवांनी मदत केली, त्यांचे धुळे सकल मराठा समाजाने आभार मानले. आरक्षणाच्या लढाईतील पुढील टप्पा २० जानेवारीपासून असून ‘चलो मुंबई’चा नारा जरांगे पाटील यांनी दिला आहे. हे आंदोलन मराठा समाजबांधवांनी एकीतून यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन बैठकीतून झाले.