जिंतूर : जिंतूर तालुक्यातील बामणी पोलीस ठाण्यातंर्गत असलेल्या मौजे कान्हा येथील संतराम त्र्यंबक दुबळकर (वय ४५) यांच्या शेतात हळदीच्या पिकात लागवड केलेली ९ गांजाची झाडे पोलिसांनी छापा टाकून जप्त केली. परभणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभाग पथक व बामणी पोलिस ठाणे पथकांनी संयुक्तपणे दि.६ ऑक्टोबर रोजी रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. जप्त केलेल्या गांजाच्य झाडाचे वजन १७ किलो असून किंमत साडेआठ लाख रुपये आहे.
पोलिस पथकाने संतराम यांच्या शेतात अचानक छापा मारला असता हळदीचे पिकात गांजाची झाडांची लागवड केलेली आढळून आली. अंदाजे १७ किलो वजनांची ८.५० लाख रुपये किंमतीची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली. या प्रकरणी याबाबत एएसआय. नितीन वडकर यांच्या फिर्यादीवरुन पोलिस ठाणे बामणी येथे संतराम दुबळकर याच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोउपनि. प्रभोधन जोंधळे हे करीत आहेत.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक तानाजी चिखले यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, पोलिस स्टेशन बामणीचे सपोनि. मनोज सुरवाडे, स्थागुशाचे पोउपनि. चंदनसिंह परिहार, पोलिस अंमलदार सिद्धेश्वर चाटे, राम पौळ, नामदेव डुबे, दीपक जाधव, अनिल राठोड, विलास बहुरे, पोलिस स्टेशन बामणीचे अंमलदार कु-हे, ठाकूर यांनी केली.
















