नंदुरबार : प्रतिनिधी
शहरातील समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वसतिगृहात एक धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. वसतिगृहात राहणा-या तब्बल २२ विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पिण्याच्या पाण्यात विष मिसळण्याचा कथित कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पालकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन महिला कर्मचा-यांमधील कथित संभाषणाचे कॉल रेकॉर्डिंग समोर आले. या ऑडिओ क्लिपमध्ये विद्यार्थिनींच्या अन्नात आणि पाण्यात विष टाकण्याबाबत चर्चा होत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हे रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थी परिषद तसेच वसतिगृहातील विद्यार्थिनींनी या घटनेविरोधात तीव्र संताप व्यक्त केला आहे. संबंधित महिला कर्मचा-यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून वसतिगृह प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
यापूर्वीही संबंधित अधिका-यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. मात्र, तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. याच निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेसह विद्यार्थिनींनी वसतिगृहाबाहेर आंदोलन छेडले. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
















