मुंबई : प्रतिनिधी
आपल्या न्याय्य आणि घटनादत्त हक्कांसाठी नाशिक ते मुंबई असा शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या गरीब आदिवासी विद्यार्थ्यांशी संवादाची भाषा करण्याऐवजी सरकार पोलीस बळाचा वापर करून त्यांना बेड्या ठोकत आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्यालय असलेल्या दादर येथील ‘टिळक भवन’मध्ये आश्रयाला थांबलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांवर मध्यरात्री झालेल्या कथित बेकायदेशीर पोलीस कारवाईवरून थोरात यांनी महायुती सरकारच्या कारभाराचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे.
मध्यरात्री घडलेल्या घटनेवर तीव्र संताप व्यक्त करताना बाळासाहेब थोरात म्हणाले, आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी नाशिकहून पायी मुंबईत दाखल झालेले आदिवासी विद्यार्थी मुक्कामासाठी सुरक्षित जागा म्हणून टिळक भवनात विश्वासाने थांबले होते. मात्र, मध्यरात्री पोलिसांनी बेकायदेशीररीत्या काँग्रेसच्या प्रदेश मुख्यालयात घुसून विद्यार्थ्यांवर दबाव आणला. त्यांना धमकावून, बळाचा वापर करत चुकीच्या पद्धतीने ताब्यात घेण्यात आले. हे कृत्य लोकशाही मूल्यांची पायमल्ली करणारे आहे.
संवादाऐवजी दडपशाही
शांततेच्या आणि सनदशीर मार्गाने आंदोलन करणा-या या आदिवासी तरुण-तरुणींशी सरकारने सन्मानाने संवाद साधायला हवा होता. त्यांच्या शैक्षणिक, वसतिगृह किंवा इतर मूलभूत समस्या समजून घेऊन त्या सोडवणे हे कल्याणकारी राज्याचे कर्तव्य आहे. मात्र, सरकारने समस्या ऐकण्याऐवजी लाठी आणि खाकीचा धाक दाखवून आवाज दडपण्याचा प्रयत्न केला.
विद्यार्थ्यांवर गुन्हेगारांसारखी कारवाई नको!
महाराष्ट्राच्या परंपरेची आठवण करून देत काँग्रेस नेत्याने सरकारला सुनावले. महाराष्ट्र हा छत्रपती शाहू, फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर चालणारा, कायद्याचे राज्य मानणारा आणि सामाजिक न्यायाचा आदर करणारा पुरोगामी प्रदेश आहे. अशा महाराष्ट्रात न्याय मागायला आलेल्या वंचित घटकातील विद्यार्थ्यांना गुन्हेगारासारखे वागवले जात आहे. लोकशाहीत प्रश्न विचारणे किंवा आंदोलन करणे हा कधीही गुन्हा ठरू शकत नाही.
आदिवासी विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीर
सरकारच्या या अरेरावी, दडपशाही आणि हुकूमशाही प्रवृत्तीचा काँग्रेस पक्ष तीव्र शब्दांत निषेध करतो. आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरलेल्या प्रत्येक आदिवासी विद्यार्थ्याच्या लढ्यात काँग्रेस पक्ष खंबीरपणे पाठीशी उभा राहील आणि या अन्यायाविरुद्ध रस्त्यापासून विधिमंडळापर्यंत जाब विचारला जाईल, असा सज्जड इशारा बाळासाहेब थोरात यांनी शेवटी दिला.
















