बुलडाणा : प्रतिनिधी
बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील तामगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत एक अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. गुप्तधनाचा शोध घेण्यावरून झालेल्या वादात चक्क पोलिसांनीच पोलिसावर जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कवठळ शिवारात काही लोक गुप्तधन शोधत असल्याची माहिती तामगाव पोलिसांना मिळाली होती. या महितीची शहानिशा करण्यासाठी पोलिस अंमलदार संतोष आखरे आणि प्रमोद मुळे रात्रीच्या सुमारास घटनास्थळी तपासासाठी गेले होते. मात्र त्या ठिकाणी त्यांना संशयास्पद असे काहीही आढळले नाही.
तपास करून परत येत असताना, पोलिसांना दोन संशयित व्यक्ती दिसल्या. अंमलदार आखरे आणि मुळे यांनी त्यांना थांबवून विचारणा केली असता त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. वादादरम्यान संशयित आरोपी राजेश गव्हाळे आणि मनोज गव्हाळे यांनी संतोष आखरे यांच्यावर हातातील स्टीलच्या कड्याने भीषण हल्ला केला. या हल्ल्यात आखरे यांच्या कपाळावर आणि पाठीवर गंभीर जखमा झाल्या आहेत. यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले दुसरे पोलिस अंमलदार प्रमोद मुळे यांनाही आरोपींनी धक्काबुक्की करत जीवे मारण्याची धमकी दिली.
घटनेनंतर जखमी संतोष आखरे यांनी तामगाव पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करून आरोपींना ताब्यात घेतले असता, धक्कादायक माहिती समोर आली. हल्ला करणारे दोन्ही आरोपी हे अकोला जिल्ह्यात पोलिस शिपाई म्हणून कार्यरत असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.
















