मुंबई : ट्रकचालकांनी पुकारलेल्या संपानंतर जिल्ह्यातील बोखेडीसह तीन ठिकाणी असलेल्या इंधन डेपोमध्ये अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांची कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली. त्यामुळे डेपोला छावणीचे स्वरूप आले. पोलिस अधीक्षकांच्या नेतृत्वात कळमेश्वरमध्ये पोलिस दाखल झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्वच पेट्रोल पंपांवर गस्त वाढविण्यात आली आहे. प्रत्येक टँकर निर्धारित स्थळी पोहोचविण्याची जबाबदारी सशस्त्र पोलिसांकडे देण्यात आली. जिल्ह्यातील सहा उपविभागांतर्गत १५ सशस्त्र पोलिसांची स्ट्रायकिंग फोर्स तसेच दंगल नियंत्रण पथक सज्ज आहे. अत्यावश्यक सेवा देणा-या वाहनांना इंधन कमी पडणार नाही, याची विशेष काळजी ग्रामीण पोलिसांकडून घेण्यात येत आहे.
पोलिसांची संयुक्त कृति समिती
शहरात जिल्ह्यातील डेपोंमधून पेट्रोल पंपांना इंधनाचा पुरवठा करण्यात येतो. टँकर पंपापर्यंत पोचविण्यासाठी शहर व ग्रामीण पोलिसांची संयुक्त कृति समिती स्थापन केली आहे. पेट्रोल पंपमालक, डेपोचे अधिकारी, ग्रामीण व शहर पोलिसांच्या अधिका-यांचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला आहे. परिस्थितीनुसार उपाययोजना आखण्यात येत आहेत. जिल्ह्यातून चंद्रपूर, वर्धा, भंडारा व अमरावतीला इंधन पुरवठा केला जातो. पुरवठा सुरळीत राहावा याची विशेष काळजी घेण्यात येत आहे, अशी माहिती अधिका-यांनी दिली.
जाळपोळ; १६ जणांना अटक
ट्रकचालकांनी सोमवारी दुपारी कुही पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाचगाव येथे रास्ता रोको करून टायर जाळले. याप्रकरणी कुही पोलिसांनी गुन्हा दाखल करून १६ जणांना अटक केली. याशिवाय गोंडखैरीतही चक्काजाम आंदोलन करणा-यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पेट्रोलसाठी मारहाण
पंपावर इंधन भरण्यावरून झालेल्या वादातून सहा जणांनी डीआरएम कार्यालयातील कर्मचा-यावर हल्ला केला. त्यात कर्मचारी अंकित मनोहर मडावी (वय २१, रा. खलाशी लाईन, मोहननगर) जखमी झाला. सोमवारी रात्री ११ वाजता अंकित हा संविधान चौकातील पंपावर मोटारसायकलमध्ये पेट्रोल भरण्यासाठी आला होता