मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना सभागृहात तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा रमी खेळत असल्याचा कथित व्हीडीओ व्हायरल झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी हा व्हीडीओ समोर आणत सोशल मीडियावर तो व्हायरल केला होता. त्यानंतर कोकाटे यांनी रोहित पवार यांच्याविरोधात नाशिकच्या न्यायालयात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे.
आमदार रोहित पवार यांना कोकाटे रमी खेळत असतनाचा व्हीडीओ कुठून मिळाला? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु हा व्हीडीओ कोकाटेंना चांगलाच भोवला त्यांना कृषीमंत्री पद सोडावे लागले. शेतक-यांकडून मोठी टीका झाली. त्यामुळे त्यांनी रोहित पवारांवर थेट अब्रुनुकनानीचा दावा दाखल केला. या दाव्याच्या छाननीनंतर पोलिसांना न्यायालयाने याप्रकरणी तपास करण्यास फ्री हॅण्ड दिले होते.
कोर्टाने या प्रकरणाचा सखोल तपास करुन ३० ऑक्टोबरपर्यंत अहवाल सादर करा, असे निर्देश पोलिसांना दिले होते. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणाचा तपास सुरु केला होता. याप्रकरणात कोर्टाने जुन्या सीआरपीसी २०२ कलमाप्रमाणे पोलिस चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार विधीमंडळात कोकाटेंचा व्हीडीओ कोणी काढला याचा तपास केला जाणार होता.
मात्र, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस विभागाने चार दिवसांची आणखी मुदत मागितली असून, ती न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायालयाने आणखी चार दिवसांची मुदत पोलिसांना दिल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान चार दिवसांनी पोलिस या प्रकरणात न्यायालयापुढे नेमका काय अहवाल सादर करतात? पोलिसांच्या हाती नेमकं काय लागलयं? त्यावर न्यायालय काय आदेश देणार याकडे लक्ष लागून आहे.

