मुंबई: विधान परिषद निवडणुकीतील कथित घोडेबाजार आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर अत्यंत गंभीर शब्दांत हल्लाबोल केला आहे. “विधान परिषदेचं राजकारण आता वेश्येला लाजवेल इतक्या खालच्या स्तरावर गेले आहे,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत.
“राजकारणाचा बाजार, ७० टक्के मतदार विकले जातात”
वडेट्टीवार म्हणाले की, “आम्ही उभे केलेले उमेदवार विकले गेले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनीही पैसे मागितले, आम्ही पैसे देणार कुठून? राजकारणाचा हा आता धंदा झाला आहे. आजच्या घडीला ७० टक्के मतदार विकले जात आहेत. भाजपला खात्री पटली आहे की, रस्त्यावर बसून हवी ती गोष्ट विकत घेता येते, त्यामुळेच त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून पैसे गोळा केले आहेत.” त्यांनी पुढे मागणी केली की, जर विधान परिषदेचे उमेदवार विकले गेले असतील, तर पैसे घेणाऱ्यावर आणि देणाऱ्यावरही कारवाई झाली पाहिजे.
ओबीसींच्या प्रश्नावर सरकारवर निशाणा
महाराष्ट्र सरकारवर ओबीसी विरोधी असल्याचा आरोप करत वडेट्टीवार म्हणाले, “हे सरकार मतं घेण्यापुरतेच ओबीसींना जवळ करते. ओबीसींमधील गरीब समाजाचा विचार करता, त्यांना स्कॉलरशिपमध्ये १०० टक्के सवलत मिळावी. आमचे म्हणणे नाही की इतरांना काही देऊ नका, पण आमचा वाटा आम्हाला मिळावा. लोकसंख्येच्या आधारावर ओबीसींना निधी दिला जावा.”
सत्ताधारी ‘हिटलर’च्या विचारांचे
देशातील बेरोजगारी आणि आर्थिक स्थितीवरूनही त्यांनी सरकारला धारेवर धरले. “देशाचा जीडीपी ७.७ दाखवणे हा निर्लज्जपणाचा कळस आहे. सत्ताधारी हिटलरच्या विचारांचे आहेत. जे सत्यासाठी लढतात, त्यांना दाबण्याचे काम सरकार करत आहे. सरकारविरोधात बोलणाऱ्या १७ वर्षांच्या मुलांना हे सोडत नाहीत, त्यामुळे दीपक यांच्यासारख्यांना भीती वाटणे सहाजिक आहे,” असे वडेट्टीवार म्हणाले.
‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनातून परिवर्तनाची नांदी
दरम्यान, ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या आंदोलनाचा उल्लेख करत, “या आंदोलनातून देशात परिवर्तनाची सुरुवात झाली आहे. तरुण आता एकवटले आहेत आणि ते रोजगारासाठी भटकणार नाहीत. आता परिवर्तन अटळ असून, हे सरकार सत्तेतून पायउतार होईल,” असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
















